वाळूज महानगर : ओळखीच्या एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला दुचाकीवरुन पळवून नेत दोन दिवस डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुण व त्याच्या मित्राविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आदिती (नाव बदलेले आहे, रा.वाळूजमहानगर) ही तरुणी बजाजनगरातील एका महाविद्यालयात बी.ए.तृतीय वर्षात शिक्षण घेते. चार दिवसांपूर्वी आदिती महाविद्यालयात असतांना तिच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन धनवे याने तिचा मोबाईल नंबर मागितला होता. मात्र, मोबाईलनंबर देण्यास नकार दिल्याने अर्जुनने आदितीस शिवीगाळ करुन मारहाण केली होती. बदनामीच्या भितीने आदितीने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. दरम्यान, शुक्रवार (दि.२) गुड फ्रायडे असल्याने आदिती ही सकाळी १० वाजेच्या सुमारास रांजणगाव परिसरातील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेली होती. प्रार्थना संपल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास आदितीस सिडकोमहानगरातील पाण्याच्या टाकीजवळ दुचाकीवरुन आलेल्या विक्की जगधणे व अर्जुन धनवे यांनी घरी सोडतो असे सांगितले.
आदितीने दुचाकीवर बसण्यास नकार देताच त्यांनी तुझ्या भावाशी बोलणे झाले आहे. आमच्यावर विश्वास नाही का अशी विचारणा केली. अर्जुन हा घराशेजारीच राहणारा असल्याने बोलण्यावर विश्वास ठेवत अदिती दुचाकीवर बसली. दुचाकीवर ट्रिपल सीट जात असतांना विक्की जगधणे याने पंढरपूरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकू असे म्हणून दुचाकी पंपावर नेली. येथे आदितीस शिवीगाळ व मारहाण करून विक्की खाली उतरला. यानंतर अर्जुनने आदितीला दुचाकीवर बसवुन सांयकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास एका गावात मित्राच्या रूमवर नेले.
येथे दोन दिवस राहिल्यानंतर रविवारी (दि.४) सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास अर्जुनने आदितीला वाळूजला सोडून दिले. वाळूजला पोहचल्यानंतर आदितीने आईशी संपर्क केला आणि घरी परतली. यानंतर आदितीने अर्जुन याने तिच्याशी शारिरीक बळजबरी केली नाही. केवळ बदनामी करण्याच्या उद्देशाने मित्र विक्की याच्या मदतीने पळवून नेल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास सहा.फौजदार जायभाये हे करीत आहेत.