खुलताबाद: सुलीभंजन दत्तधाम मंदीर परिसरात रिल्स काढण्याच्या नादात कार डोंगरच्या दरीत कोसळून भीषण अपघातात तरूणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात मयत तरूणीसोबत असलेल्या युवकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत तरूणी श्वेता हिचा भाऊ मनिष सरोसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुरज संजय मुळे याने श्वेता हिस छत्रपती संभाजीनगर शहरापासून ४० किमी लांब डोंगरावर नेले. येथे सूरजने श्वेताला कार चालविता येत नाही हे माहिती असूनही कार ( क्रंमाक एम एच २१ बीएच ०९५८) चालविण्यास दिली. यानंतर रिव्हर्स गिअरमध्ये कार मागे जात दरीत कोसळून श्वेताचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. श्वेताच्या मृत्यूला सूरज हाच कारणीभूत व जबाबदार आहे. या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीसांनी कलम ३०४ अ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून सूरज मुळे यास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोरे हे करत आहे.
सकाळी झाले शवविच्छेदनदरीतून श्वेता सरोसेचा मृतदेह सांयकाळी खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. मात्र, श्वेताच्या नातेवाईकांना सांयकाळनंतर घटना माहिती झाली. त्यानंतर जवळपास ७ वाजता तिचा भाऊ मनिष सुरवसे खुलताबाद रूग्णालयात आला. तोपर्यंत श्वेता हिचा मृत्यू झाला असल्याचे त्याला सांगण्यात आले नव्हते. त्यानंतर इतर मित्र नातेवाईक दाखल आले. दरम्यान, रात्री शवविच्छेदन होऊ शकले नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी १० वाजेनंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर श्वेताचे नातेवाईक गुन्हा दाखल करण्यासाठी खुलताबाद पोलीस ठाण्यात गेले. दुपारी २ वाजेच्या आसपास गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मृतदेह घेवून नातेवाईक छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले.
कार दोन वेळेस खडकावर आदळलीसुरजने श्वेताला गियर टाकून एक्सलेटर दाबायला सांगितले. मात्र, गाडी रिव्हर्समध्ये जाऊन वेगात मागे गेली व डोंगरावरून दरीत कोसळली. दरीतील खडकावर दोनवेळेस कार आदळून श्वेता कारच्या बाहेर फेकली गेली. त्यात श्वेता दगडांवर आदळून गंभीर जखमी झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार यात श्वेताच्या शरीरातील बहुतांश हाडे मोडली असावीत. घटनेनंतर पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले. रात्री उशिरा श्वेताचा मृतदेह घाटीत शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला.
श्वेताचे कुटुंब मूळ मुंबईचेश्वेताचे कुटुंब मूळ मुंबईचे रहिवासी असून काही महिन्यांपूर्वीच ते शहरात स्थायिक झाले होते. हनुमाननगर च्या गल्ली क्रौ २ मध्ये श्वेताचे कुटुंब राहते तर सूरज गल्ली १ मध्ये राहतो. सकाळी दोघेच त्याच्या मामाच्या कारने निघाले होते. पदवीपर्यंत शिक्षण झालेली श्वेता एका खासगी बँकेत नोकरी करत होती. कुटुंबात सर्वांत लहान असलेल्या श्वेताची मोठी बहीण विवाहित असून वडील व मोठा भाऊ खासगी नोकरी करतात.