औरंगाबाद : आपल्याला नाकारणाऱ्या मुलीसोबत तुम्ही सोयरीक करू नका, अशी धमकीपत्रे टाकत नकार मिळालेल्या तरुणाने नियोजित नवरदेवाच्या हॉटेलवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पडेगावातील रामगोपालनगरात घडली.
माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. संशयित आरोपी हा तक्रारदाराचा चुलत भाचा असल्याचे सूत्राने सांगितले.
विशाल मनोहर गाडीलकर (रा. कोपर्डी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे संशयिताचे नाव आहे. यावेळी त्याच्यासोबत अन्य एक जण होता. तक्रारदार मनीष किसनराव गायकवाड या तरुणाचे पडेगाव येथे हॉटेल मनीष इन हे हॉटेल आणि लॉजिंग आहे. या हॉटेलच्या मागे तो आईवडील आणि दोन बहिणींसोबत राहतो. मनीषचे दोन महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील चुलत मामाच्या मुलीसोबत लग्न जमले आहे. २५ एप्रिल रोजी त्यांचा विवाह होणार आहे. मनीषचे लग्न जमण्यापूर्वी आरोपी विशालने त्या तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. तरुणी आणि विशाल यांच्या वयात ९ वर्षांचे अंतर असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी विशालचे स्थळ नाकारले होते. आपल्याला नाकारणाऱ्या मुलीचे लग्न चुलत मामा मनीषसोबत जमल्याचे विशाल आणि त्याच्या नातेवाइकांना समजले. आपल्याला नाकारणाऱ्या मुलीच्या कुटुंबासोबत तुम्ही सोयरीक करू नये याकरिता संशयित आरोपी विशाल आणि त्याच्या नातेवाईक गायकवाड कुटुंबावर दबाव टाकत होते. मनीषला मुलगी पसंत असल्यामुळे गायकवाड कुटुंबाने मनीष आणि त्या तरुणीचा विवाह निश्चित केला. २५ एप्रिल ही लग्नाची तारीख काढण्यात आली. आपले ऐकत नसल्याचे पाहून आरोपी विशाल याने २५ फेब्रुवारी रोजी मनीषचे वडील किसन गायकवाड यांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून त्या मुलीचा विचार सोडा असे नमूद केले होते. गायकवाड कुटुंबाने त्या मेसेजकडे दुर्लक्ष केले आणि ते लग्नाच्या तयारीला लागले.
३० मार्च रोजी रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे गायकवाड कुटुंब झोपले. रात्रपाळीचा हॉटेलचा मॅनेजर शेख मुजफ्फर स्वागत कक्षातील सोफ्यावर अंगावर ब्लँकेट ओढून झोपला होता. रात्री ३ वाजेच्या सुमारास फटाके फुटल्यासारखा आवाज झाल्यावर तो झोपेतून उठला. यावेळी त्याच्या ब्लँकेटवर काचा पडलेल्या होत्या. शिवाय स्वागत कक्षाच्या काचेवर छिद्र पडलेले आणि काचेला तडे गेल्याचे दिसले. कोणीतरी दगड मारला असेल असे समजून त्याने शेजारीच राहणाऱ्या मनीषला आवाज देऊन उठवले.
============
चौकट
तब्बल १९ प्रतीत धमकीपत्र फेकले
गायकवाड झोपेतून उठले तेव्हा त्यांना घराच्या आवारात धमकी पत्राचा गठ्ठा आढळून आला. यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता. दुचाकीस्वार दोन तरुण त्यांच्या हॉटेलसमोर आले. यापैकी एक जण खाली उतरून उभा राहतो तर दुसरा हेल्मेट घालून कंपाउंड वॉलबाहेरून धमकी पत्र टाकतो व नंतर तो लॉजिंगच्या दिशेने येतो. डाव्या हाताने पिस्तुलातून पहिली गोळी पहिल्या मजल्यावरील खिडकीवर झाडतो. यानंतर तो परत जातो आणि उजव्या हाताने दुसरी गोळी स्वागत कक्षाच्या काचेवर झाडतो आणि साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेल्याचे दिसले. गोळीबार करणारा विशाल असल्याचा संशय बळावल्याने मनीषने त्याच्यासह अन्य आरोपीविरुध्द छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली.
===============
पोलीस आयुक्तासह अन्य अधिकारी घटनास्थळी
मनीष यांनी तातडीने माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त विवेक सराफ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, मनोज पगारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन वायाळ, पी. एस. भागिले आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.