औरंगाबाद : दुचाकीवर पाठलाग करून छेड काढणाऱ्या एका रोडरोमिओला तरुणीने रविवारी रात्री चांगलाच हिसका दाखवत, त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. यामुळे संतापलेल्या त्या सडकसख्याहरीने दोन अल्पवयीन साथीदाराला सोबतीला घेत, तिला आणि तिच्या आईला व्यंगावर दूषणे देत शिवीगाळ केली. मात्र, त्यालाही न जुमानता तिने थेट पोलिसांत तक्रार नोंदविली. हा प्रकार रविवारी रात्री शिवाजीनगर येथे रस्त्यावर झाला.
पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी एकाच गल्लीत राहतात. रविवारी रात्री ती दुचाकीवरून जात असताना गल्लीतील तरुण त्याच्या दोन साथीदारांसह तिच्या मागावर असल्याचे दिसले. तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पेट्रोल पंपावर इंधन भरून ती तिच्या दुकानाकडे जात असताना, आरोपीने तिच्या गाडीसमोर स्वतःची दुचाकी आडवी लावली. तिने त्याला दुचाकी काढण्याचे सांगितले. मात्र, त्यांनी दुचाकी तर काढली नाहीच, उलट तिलाच तो आणि त्याचे दोन मित्र शिवीगाळ करीत होते. तिने थेट त्याच्या दुचाकीची चावी काढली आणि ती दुकानात गेली.
तिच्यापाठोपाठ तो मित्रांसह तेथे आला. त्याने तिला चावी मागितली. मात्र, तिने माफी माग, तरच दुचाकीची चावी मिळेल, असे बजावले. तो मात्र, तिची माफी मागत नव्हता, उलट तिला आणि तिच्या आईच्या व्यंगाकडे उंगली निर्देश करीत शिव्या देऊ लागला. यामुळे तिथे बघ्यांची गर्दी जमली. काहींनी मुलीलाच समजावून त्याला चावी घेऊन टाक, असेही सांगितले. तिने मात्र, जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत किल्ली मिळणार नाही, असे सांगितले. शिवाजीनगर रस्त्यावर गर्दी झाल्याची माहिती कळताच, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या मुलाला पोलीस ठाण्यात आणले. तिनेही मोठ्या धाडसाने त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला.
तक्रार न देण्यासाठी दबाबपुंडलिकनगर ठाण्यात ती दाखल झाली, तेव्हा तिने गुन्हा नोंदवू नये, याकरिता तिच्यावर दबावही आणला गेला. मात्र, ती दबावाला बळी पडली नाही. पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले.