औरंगाबाद : तो परभणीत, तर ती औरंगाबादेत राहते. फेसबुकवर त्यांची मैत्री झाली. इंस्टाग्राम, मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्यात बोलणे सुरू झाले. सात ते आठ महिन्यांच्या कालावधीतील संवादाला ती प्रेम समजत होती. यातून तिने त्याला तिच्यासोबत लग्न करणार का विचारले, त्याने आपली केवळ मैत्री आहे, असे सांगून तिला स्पष्ट नकार दिला. प्रेमात अपयश आल्यामुळे ती खचली आणि १३ जानेवारी रोजी गळफास घेऊन तिने जीवनयात्रा संपविली. नुकतीच तिची सुसाईड नोट नातेवाइकांना सापडली. या चिठ्ठीच्या आधारे जवाहरनगर पोलिसांनी त्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला.
आकाश रामराव गायकवाड (वय २५, रा. गांधीनगर, परभणी) असे गुन्हा नोंद झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवशंकर कॉलनीतील रहिवासी सुरेखा (काल्पनिक नाव) ही शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती, तर आकाश परभणी येथे मजुरी करतो. सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुरेखा आणि आकाशची मैत्री झाली. तेव्हापासून ते मोबाईल, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बोलू, चॅटिंग करू लागले. सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंगच्या मेसेजपासून ते रात्री झोपण्याआधी गुड नाईटचे मेसेज पाठवून ते एकमेकांशी कनेक्ट राहात. त्यांच्यातील या मैत्रीला तिने प्रेम समजले, तर तो केवळ मैत्रीण म्हणून सुरेखाकडे पाहत होता. १३ जानेवारी रोजी तिने त्याला तीन ते चार कॉल करून लग्न करशील का? असे विचारले. मी तुला केवळ मैत्रीण समजतो, असे सांगून त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. आकाशने प्रेम नाकारल्यामुळे तिने थेट गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती.
====(================
चौकट
पोलिसांनी केली होती आकाशची चौकशी
सुरेखाच्या आत्महत्येनंतर जवाहरनगर पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला होता. तेव्हा आकाशसोबत ती बोलल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला बोलावून चौकशी केली. तेव्हा सुरेखाला तो प्रत्यक्ष एकदाही भेटला नसल्याचे म्हणाला. तिच्या आई-वडिलांनीही आकाश कोण हे माहिती नाही. त्यांनीही त्याला कधी पाहिले नव्हते. मात्र, ती रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर बोलत असे, असे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. आकाशने सांगितल्यानुसार इंस्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांची मैत्री होती. १३ जानेवारी रोजी सुरेखाने लग्नाची मागणी केली होती. मी तिला केवळ मैत्रीण समजत असल्यामुळे तिला लग्नास नकार दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.
=====================
चौकट
सुसाईड नोटमध्ये आकाशला धरले जबाबदार
घरात साफसफाई करताना तिच्या आई-वडिलांना सुरेखाची सुसाईड नोट नुकतीच सापडली. या चिठ्ठीत तिने तिच्या आत्महत्येला आकाश जबाबदार असल्याचे नमूद केले. या चिठ्ठीच्या आधारे बुधवारी तिच्या वडिलांनी आकाशविरुद्ध गुन्हा नोंदविला. फौजदार शशिकांत तायडे तपास करीत आहेत.