बापू सोळुंके
औरंगाबाद: कोणतेही शस्त्र बाळगणे गुन्हा असतानाही शहरातील विविध वसाहतींमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण गावठी कट्टे, तलवार आणि चाकू, सुरे आदी घातक शस्त्रे बाळगून सामान्यांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याचे समोर येत आहेत. हे तरुण वाढदिवसाचा केक तलवारीने कापतात, लग्नाच्या वरातीत तलवार हातात घेऊन नाचताहेत, असे प्रकार शहरात दिसून येत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी पुंडलिकनगर येथे पोलीस आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधला होता. तेव्हा तरुण शस्त्रे घेऊन फिरतात आणि काही पानटपरीमध्ये ते शस्त्रे लपवून ठेवतात, अशी तक्रार माजी नगरसेविकेने केली होती. ही एक प्रातिनिधिक तक्रार समजून पोलीस आयुक्तांनी शहरातील
गुंड प्रवृत्तीच्या लोकांची झाडाझडती घेणे अपेक्षित होते. चार दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेल्या निष्पाप तरुणाची पाचशे रुपयांसाठी निर्घृण हत्या झाली. आठ दिवसांपूर्वी रामनगर येथील एका रुग्णालयासमोर एका पोलीस पुत्राने तरुणाला चाकूने भोसकून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक घटना रोज घडत आहेत. ही शस्रे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडे कोठून येतात, असा प्रश्न आहे.
गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा शस्त्रासह एखादा व्हिडिओ अथवा छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यावर वरिष्ठांकडून विचारणा होईल, हे लक्षात घेऊन पोलीस कारवाई करतात.
पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांनी गेल्या आठवड्यात मिटमिट्यात कारवाई करीत गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले. या कारवाईच्या दोन दिवसांनंतर गुन्हेशाखेचे सपोनि शिंदे यांनी अशीच कारवाई करीत गावठी कट्टा घेऊन आलेल्या तरुणाला अटक केली. गावठी कट्टा, तलवार आणि चाकू, सुरे बाळगणारे तरुण कोण आहेत आणि कुठे राहतात, याची माहिती स्थानिक पोलिसांकडे नक्कीच असते. पोलिसांचे गुन्हेगारांकडे होणारे दुर्लक्ष सामान्यांचा विश्वास गमावण्यासारखे आहे.
तीन वर्षांपर्वी पोलिसांनी गुन्हेगारांच्या घरांतून घातक शस्त्रे शोधून काढण्याची मोहीम हाती घेतली होती; मात्र त्यातून फारसे काही हाती लागले नव्हते.