औरंगाबाद : शहराच्या राजकारणात आता गॅस आणि जलवाहिनीचा बोलबोला सुरू आला आहे. शिवसेनेच्या गडात बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत भाजपने २ हजार कोटींच्या पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) च्या कामाच्या भूमिपूजनाचा बार उडविला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेना - भाजपचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने शहरात प्रथमच स्वबळावर गर्दी जमवून महापालिका, जि. प., पं. स.च्या आगामी निवडणुकीसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर संघटन दाखवून शिवसेनेला शह देत माजी खासदारांना टीकेचे लक्ष्य केले. जलवाहिनीचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करीत डिसेंबर २०२२ पर्यंत पीएनजीचे वितरण शहरात होईल, असा दावा करीत भाजपने शिवसेनेवर टीका केली.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, शहरात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. ५५ कि. मी. लांबून पाणी आणावे लागते. राज्य शासनाचे औरंगाबादकडे लक्ष नाही. पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने होत आहे. जॅकवेलसाठी अर्ज केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान कार्यक्रमाला गर्दी किती आहे, नागरिक कुठून आले आहेत. कार्यक्रमात काही गडबड, प्रशासनातील कोण अधिकारी उपस्थित आहेत, याची माहिती शिवसेनेकडून घेण्यात येत होती. महाविकास आघाडीच्या आमदारांनी, एमआयएमच्या खासदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. बीपीसीएलने निमंत्रितांसाठी काढलेल्या पत्रिकेत एमआयएम, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व लोकप्रतिनिधींची नावे होती.
महिलांचा सन्मानस्वयंपाकासाठी गॅस लागतो, बहुतांशपणे महिलांशी निगडित हे काम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्वाधिक महिलांची गर्दी होती. त्यांना फेटे बांधून सभामंडपात बसविण्यात आले होते.
माजी खासदाराने २० वर्षांत काय केले ?आ. हरिभाऊ बागडे यांनी खैरेंचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, यापूर्वीच्या खासदाराने २० वर्षांत पाणी दिले नाही. समांतर जलवाहिनीची योजना आणली, ती गुंडाळली. पंतप्रधान आवास याेजनेचे कामही शासनाने हळूहळू करण्यास प्रशासनाला सांगितले असेल. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, २० वर्षे खासदार म्हणून राहिले, पण एकही काम नाही केले. गॅस पाईपलाईनसाठी निवेदन दिल्यामुळेच योजना आल्याचे माजी खासदार सांगत आहेत. मी आता रेल्वेची कामे पूर्णत्वाकडे नेत आहे, तर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना मीच निवेदन दिले होते, म्हणून आता काम होत असल्याचे ते सांगत असल्याचा टोला त्यांनी लावला.