लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुकुंदवाडीत चुलत्याच्या घरी आलेल्या तरुणाने स्वत: पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पेटलेल्या अवस्थेत तो रस्त्यावर पळत सुटला. प्रत्यक्षदर्शी आणि नातेवाईकांनी त्यास विझविले. या घटनेत तो ८० टक्के जळाला असून, त्यास घाटीत दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. ९) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.बाळा राम बचुटे (२५,रा. कोथरूड, पुणे) असे तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, बाळा बचुटे याचे नववीपर्यंत शिक्षण झालेले आहे. तो इलेक्ट्रिकलची कामे करतो. तो काही दिवसांपासून निराश होता. यामुळे त्याचे वडील त्यास घेऊन मुकुंदवाडीत राहणारे मावस काका सिद्धार्थ चंदनशिवे यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी आले होते. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी कोणी नसताना बाळाने स्वत:ला पेटवून घेतले. पेटलेल्या अवस्थेत तो रस्त्याने पळत सुटला. यावेळी त्याचे नातेवाईक आणि अन्य प्रत्यक्षदर्शींनी त्याच्या अंगावर पाणी फेकले आणि काहींनी चादर टाकून विझविले. या घटनेत तो ८० टक्के भाजला. यानंतर शुभम चंदनशिवे आणि अन्य लोकांनी त्याला घाटीत दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून घटनेची नोंद मुकुंदवाडी ठाण्यात घेण्यात आली. तपास पोलीस नाईक गोकुळ जाधव करीत आहे. त्यांनी बाळाचा जबाब नोंदविला असून त्याने स्वत:हून जाळून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. शिवाय जाळून घेण्याचे कारण मात्र पोलिसांना सांगितले नाही.
मुकुंदवाडीत जाळून घेतलेला तरुण रस्त्यावर पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:19 AM