औरंगाबाद : बायजीपुरा परिसरातील संजयनगर येथे एका रिक्षा चालकाने आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली.कृष्णा रतनराव चिलघर असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे.के. जाधव यांनी कृष्णास वाहन चालकपदी सेवेत कायम करण्याचे आमिष दाखवून कर्ज उचलून नोकरीवर कायम न करता काढून टाकल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या भावाने केला.
याविषयी मृताचा भाऊ प्रकाश यांनी सांगितले की, मृत कृष्णा हा चार ते पाच वर्षांपासून लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे. के. जाधव यांच्याकडे वाहनचालक म्हणून कामावर होता. वर्षभरापूर्वी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. बँकेत वाहनचालक म्हणून कायमस्वरूपी नोकरी लावतो, असे अमिष दाखवून जे.के. जाधव यांनी आपल्या नावे लोकविकास बँकेतून एक लाख रुपये कर्ज घेऊन ती रक्कम स्वत: घेतली. शिवाय कृष्णाने बचत गटाचे कर्ज उचलून एक लाख रुपये जाधव पिता-पुत्राला दिले. कर्जाचे हफ्ते फेडण्याच्या नावाखाली त्यास सुमारे एक वर्ष वेतनही दिले नाही. ही बाब कृष्णाला समजल्यानंतर त्याने जाधव यांना याविषयी विचारल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले.
तेव्हापासून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित. मात्र जे.के. जाधविरोधात त्याने जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. या अर्जाची चौकशी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी कृष्णाकडे वीस हजार रुपये लाच मागितली. जिन्सी ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक हाश्मी यांनी वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई करण्यास नकार दिला होता. यामुळे कृष्णा अधिक त्रस्त झाला होता. एवढेच नव्हे तर कर्जाची परतफेड करावी, म्हणून बँकेचे अधिकारी त्यास त्रास देत होते. याविषयी कृष्णाने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे त्याचा भाऊ प्रकाश यांनी सांगितले. कृष्णाची पत्नी संक्रांतीनिमित्त मुलाबाळासह माहेरी गेली होती.तर वडिल बँकेत गेले असताना घरी एकटा असलेल्या कृष्णाने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी जिन्सी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष जे. के . जाधव यांच्याशी संपर्क व्होऊ शकला नाही.