कामगारांच्या थकीत वेतनावरून युवक काँग्रेसची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 05:55 PM2021-01-21T17:55:35+5:302021-01-21T17:56:15+5:30
कार्यकर्त्यांनी बीव्हीजी कार्यालय गाठले व वेतनासंबंधीचा जाब विचारला.
औरंगाबाद : वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांना कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार पुरविणाऱ्या बीव्हीजी कार्यालयात गुरुवारी शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
हे कार्यालय खोकडपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बीव्हीजी कंपनीने आमचे वेतन दिले नाही, अशी तक्रार या कामगारांनी युवक काँग्रेसकडे केली. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फरखान पठाण, डॉ. निलेश आंबेवाडीकर, अब्दुल अजीम, सलीम शेख, विजय कांबळे, मयूर साठे, सचिन सकट, आकाश रगडे, अमोल थोरात, योगेश बहादुरे या कार्यकर्त्यांनी बीव्हीजी कार्यालय गाठले व वेतनासंबंधीचा जाब विचारला. रागाच्या भरात डॉ. आंबेवाडीकर यांनी खुर्ची उचलली व फर्निचरची तोडफोड केली. चोवीस तासांत या सफाई कामगारांना त्यांचा पगार न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.