धोत्रा येथील संदिप सुरडकर हा युवक अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. गावात मोलमजुरी करुन तो कुटुंबाचा गाडा हाकत होता; मात्र एकदिवस अचानक त्याला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने गाठले. यामुळे संपूर्ण कुटुंब हादरले. परिस्थिती हलाखीची असल्याने उपचारासाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला. या गरीब कुटुंबाची विवंचना गावातील काही युवकांच्या लक्षात आली. त्यांनी संदीपला मदत करण्याचा चंग बांधला. या युवकांनी तीन दिवसांत अठरा हजार रुपये जमा करुन संदीपकडे उपचारासाठी दिले. तसेच गावातील नागरिकांनाही संदीपला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिवाराची पोटाची खळगी भरत असताना अचानक त्याला कॅन्सरसारख्या आजाराने घेरले याबाबत गावातील काही जागरूक युवकांनी संदीपला मदत करण्याबाबत आवाहन केले. बघता बघता तीन-चार दिवसातच अठरा हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली,ती रक्कम संदीप सुरडकर यांना उपचारासाठी देण्यात आली आहे. धोत्रा ही सिद्धेश्वर महाराजांची पावनभूमी आहे. येथील युवकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोट...
संदीप सुरडकर हा आमच्या गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील मेहनती तरुण आहे. त्याला कॅन्सरसारख्या आजाराने घेरल्याने आम्ही तरुणांनी त्याला धीर देत अल्पशी मदत दिली आहे. लोकांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. समाजातील दानशुरांनी या गरीब कुटुंबाला मदत करावी.
- विशाल जाधव, धोत्रा