उस्मानाबाद : शहरातील समता नगर भागात खासगी शिकवणी, स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणाऱ्या एका ३४ वर्षीय युवकाचा तळ्यात पोहताना बुडून मृत्यू झाला़ ही घटना रविवारी सायंकाळी भूम तालुक्यातील सोन्नेवाडी शिवारात घडली़ दरम्यान, घटनेनंतर पार्थिव जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी आपल्या मुलासोबत घातपात झाल्याचा आरोप करीत इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली़ नागरिकांची आक्रमक भूमिका आणि प्रशासनामधील समन्वयाचा अभाव यामुळे मयत युवकाच्या पार्थिवाचे १९ तासानंतर सोमवारी दुपारी ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले़पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील मेडसिंगा येथील रहिवासी असलेले अविनाश अवताडे (वय ३४) हे मागील काही वर्षापासून शहरातील समता नगर भागात खासगी शिकवणी, स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेत होते़ अविनाश अवताडे व त्यांचे काही मित्र रविवारी भूम तालुक्यातील सोन्नेवाडी शिवारात गेले होते़ सायंकाळच्या सुमारास मित्रांसमवेत तळ्यात पोहत असताना अविनाश अवताडे यांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला़ सोबत असलेल्या मित्रांनी त्यांचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात आणले़ घटनेची माहिती मिळताच अवताडे यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने रूग्णालयात एकच गर्दी केली़ अविनाश यांचा मृत्यू बुडाल्याने नाही तर घातपाताने झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन करण्याची मागणी लावून धरली़ रूग्णालय परिसरात निर्माण झालेला तणाव पाहता शहर ठाण्याचे पोनि डी़एम़शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी रूग्णालयात धाव घेतली़ रात्री उशिरापर्यंत ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन करण्याची मागणी नातेवाईकांनी लावून धरली होती़ काही वेळा लातूरला तर काहीवेळा सोलापूरला ‘इनकॅमेरा’ शविच्छेदनासाठी पार्थिव नेण्याबाबत चर्चा करण्यात आली़ मात्र, रात्री उशिरापर्यंत प्रशासनामधील समन्वयाच्या अभावामुळे शवविच्छेदन होऊ शकले नाही़ दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रूग्णालयातच ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले़ दरम्यान, ही घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने वाशी ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही जिल्हा रूग्णालयात धाव घेतली होती़ शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहर ठाण्यात शून्यने नोंद करून कागदपत्रे वाशी पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आली आहेत़ दरम्यान, अविनाश अवताडे यांच्या मृत्यूने शहरासह मेडसिंगा व परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या तपासाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)
तळ्यात पोहताना युवकाचा बुडून मृत्यू
By admin | Published: November 15, 2016 12:36 AM