लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : टाळ्यांच्या गजरात, रसिकांच्या प्रतिसादात नाट्य, लावणी, भांगडा, आदिवासी नृत्य, मूकनाट्यासह इतर कलाप्रकारांचे सादरीकरण अन् तरुणाईचा जल्लोष, हे दृश्य आहे छत्रपती शाहू महराज शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयात आयोजित विभागीय युवक महोत्सवाचे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेतर्फे कृषी महाविद्यालयात विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव पद्माकर मुळे, विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. महेश देशमुख, प्राचार्य डॉ. डी. के. शेळके, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. एस. सी. भोयर, ए. बी. आहेर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना युवक महोत्सवांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होते. या सर्व कलाप्रकारांचा सर्वांनी आनंद घ्यावा, यात बक्षीस मिळालेच पाहिजे असा कोणाही अट्टहास धरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांच्या विविध कलाविष्कारांच्या सादरीकरणाला सुरुवात झाली. यात नाटक, लोकनृत्य, विडंबन, एकपात्री अभिनय, मूक अभिनय, नक्कल आदी कला प्रकारांचा समावेश होता. या महोत्सवात कृषी विद्यापीठाशी संलग्नित २३ शासकीय आणि खाजगी महाविद्यालयांतील ६२१ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यात ३८१ मुले, तर २४० मुलींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणिता मुळे यांनी केले, तर प्रा. रूपाली निकम यांनी आभार मानले. युवक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रा. ए. व्ही. जाधव, डॉ. पी. एस. बैनाडे, प्रा. आर. आर. राठोड, प्रा. ए. ए. भोंडवे, डॉ. एस. आर. वानखेडे आदी परिश्रम घेत आहेत.
कृषी महाविद्यालयात कलाविष्कारांची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:36 AM