गंगापूर: तालुक्यात रविवारी (४) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळासह मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. तूर्काबाद शिवारात वीज पडून एक जण ठार तर एक जण जखमी झाला;रायपूर शिवारात दोन बैल व एक गाय दगावल्याची घटना घडली.
रविवारी दुपारी अचानक वीजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वार्यासह पाऊस झाला,सुमारे तासभर झालेल्या वादळासह पावसाने शहर व तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले.वादळामुळे ठीक ठिकाणी घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.तूर्काबाद शिवारात शेतात काम करीत असताना वीज पडून कृष्णा रामदास मेटे (२२) हा तरुण ठार झाला तर निलेश संतोष मेटे (१५ ) हा गंभीर जखमी झाला. रायपुर शिवारात निकम वस्ती येथे विज पडल्याने शेतकरी अंबादास निकम यांचे दोन बैल व एक गाय दगावली.
जामगांव येथे लक्ष्मण ठमाजी गुळे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठ नुकसान झाले.अहमदनगर महामार्गावर लिंबे जळगाव परिसरात झाड पडल्याने काही काळ वाहतूक टप्प झाली होती.पोलिसांनी ट्रकच्या सहाय्याने झाड बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू केली.गंगापूर शहरात वादळाने अनेक झाडं उन्मळून पडली यातील काही झाड विद्युत खांबावर पडल्याने शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.गेल्या आठवड्यात तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढली होती मान्सून पूर्व सरी कोसळल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला