छत्रपती संभाजीनगर: सोशल मिडियात प्रभाव वाढविण्यासाठी रील्सचे मोठे महत्व आहे. मात्र, नावीन्यपूर्ण, कल्पक रील्स बनविण्याचे सोडून तरुणाई जीव धोक्यात घालून नसते उद्योग करत आहेत. रिल्सनं तरुणाईला पछाडलं असून वेरुळ लेणीच्या डोंगरावर रील्स शूट करतानाच धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सूलीभंजन येथे दरीत पडून तरुणीचा मृत्यू, पुण्यातील उंच इमारतीवरील स्टंट या घटना ताज्या असतांना वेरूळच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर स्टार होण्यासाठी तरुणाई कोणत्याही स्तराला जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
तरुणांमध्ये सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रिल्स बनवण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लाइक, शेअर, व्युजच्या नादात अनेकदा तरुणाई पुढे धोका माहिती असूनही तो पत्करत असल्याच्या घटना समोर आल्या हेत. रील्सच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घातल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. आठवडाभरा पूर्वी खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन या धार्मिक पर्यटनस्थळी एक तरुणी कार चालवत असताना तिचा मित्र रील्स शूट करत होता. मात्र रिव्हर्स घेत असताना कार वेगाने डोंगरावरून दरीत कोसळली. या भीषण अपघातात कार खडकावर दोनदा आदळून तरुणी बाहेर फेकली गेली. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कार चालविण्यास देणारा आणि रील्स शूट करणाऱ्या तरुणावर गुन्हा नोंद झाला आहे. त्यांतनर पुण्याचा एक थरारक व्हिडिओ समोर आला. यात पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर काही तरुण जीवघेणा स्टंट करताना दिसले. एक तरुणी या उंच वास्तूवरून खाली लटकली आहे, तर वरती असलेल्या एका तरुणाने तिचा हात पकडला आहे. चुकूनही तिचा हात सुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास लेणीच्या डोंगरावर धोकादायक रील्स दरम्यान, वेरूळच्या कैलास लेणीच्या बाजूच्या डोंगरावर जीव धोक्यात घालून तरुणी रील्स करताना आढळून आली. एक तरुणी डोंगराच्या कडेला येऊन डान्स करत आहे, तर दुसरी त्याचा व्हिडिओ करत आहेत. डोंगराच्या कडेला नीट उभा राहता येत नाही अशा असुरक्षित ठिकाणी रील्स करताना मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता असतानाही या तरुणी रील्स शूट करत होत्या. हा व्हिडीओ नेमका कधी शूट केला आहे, तसेच यातील तरुण तरुणी कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही.
रील्ससाठी तरुणाई धोका पत्कारायला तयाररील्समधील सर्जनशील, कल्पनेचं कौतुक होतं. मात्र आता या रील्स कलेला विकृत रूप येऊ लागल्याचं दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या फार आहे. काहीतरी स्टंट करायचा किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचं फॅड वाढत आहे. त्यामुळे अनेक रील्स स्टार वेगवेगळे स्टंट करतात. अनेकदा जीवाला धोकादेखील निर्माण होऊ शकतो हे माहित असूनही अनेक लोक प्रसिद्धीसाठी असे घातक असणारे रील्स करतात. रील्स बनवण्याचा इतका मोह असतो की, या नादात अनेकांना आपल्या जिवाचीही पर्वा राहात नाही. यावर रील्स स्टारचे स्वयंनियंत्रण आणि स्टंट रील्सवर फिल्टर लावणे हाच उपाय असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.