औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ( Youth NCP ) प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहीम शेख (रा. शिरूर, जि. बीड) ( Mehbub Shaikh ) याच्याविरुद्ध दाखल बलात्काराच्या गुन्ह्याचा ‘बी’ समरी अहवाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सचिन यू. न्याहारकर यांनी २१ सप्टेंबर रोजी फेटाळला. तपास अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी तो अहवाल दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने सिडको ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सदर गुन्ह्याचा योग्य तपास होण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी तपासावर देखरेख आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. ( Youth NCP state president Mehbub Shaikh in trouble; The crime of rape will be investigated)
पोलिसांनी ‘बी’ समरी अहवाल सादर केल्यानंतर पीडितेच्या जबाबानुसार तिने घटनेनंतर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती; तसेच १५ जानेवारी २०२१ रोजी न्यायालयाने तिचा जबाब नोंदविला होता. त्यात तिने मेहबूब शेख याच्या नावाचा उल्लेख केला होता. आरोपी राजकारणी असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. उलटपक्षी वारंवार तक्रारदाराच्या घरी जाऊन तिचे चारित्र्यहनन केले. घटनेच्या वेळी तो तिथे नव्हता या आरोपीच्या जबाबावर पोलिसांनी विश्वास ठेवला. ‘बी’ समरी रिपोर्ट नामंजूर करून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत अथवा सीबीआयमार्फत या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश द्यावेत, असा जबाब तिने दिला होता. पीडितेचे वकील एल. डी. मणियार यांनीही पीडितेच्या जबाबाचा पुनरुच्चार केला. पोलिसांनी दाखल केलेला ‘बी’ समरी अहवाल नामंजूर करून पुढील तपासाचा आदेश देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली.
न्यायालयाचे निरीक्षणपीडितेने प्रथम माहिती अहवालात आणि न्यायालयात आरोपीचा खास नामोल्लेख केला आहे. पोलिसांनी कायद्यानुसार तपास केला नसल्याने व योग्य निष्कर्ष काढला नसल्याने बी समरी अहवाल स्वीकारण्यायोग्य नाही, असा स्पष्ट उल्लेख करीत न्यायालयाने तो फेटाळला.