वाळूज महानगर : एका वाहनातून आलेल्या अनोळखी तरुणांनी अंधाराचा फायदा घेत सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री सिडको वाळूज महानगरातील साई रिजेन्सी हाऊसिंग सोसायटी येथे घडली. सोसायटीतील नागरिक मदतीला धावल्याने तरुणांनी तेथून पळ काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे सुरक्षारक्षकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिडको वाळूज महानगरातील गट नंबर १५ मध्ये साई रिजेन्सी हाऊसिंग सोसायटी आहे. महानगरातील सुरक्षा व खत प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी सोसायटीतील रहिवाशांनी संतोष भाऊसाहेब कोल्हे यांना सुरक्षारक्षक म्हणून नेमले आहे. ते दोन वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कोल्हे घराबाहेर आले असता त्यांना सोसायटीच्या गेटसमोर अंधारात पांढऱ्या रंगाची जीप उभी असल्याचे दिसले.
जीपमधील तिघांनी खोली भाड्याने आहे का, अशी कोल्हे यांना विचारणा केली. तेव्हा एवढ्या रात्री खोली भाड्याने कशाला हवी असे म्हणताच यातील एकाने कोल्हे यांना पकडले व दोघांनी मारहाण करायला सुरुवात केली. कोल्हे यांनी आरडाओरड केली. दरम्यान, सोसायटीतील काही रहिवासी गप्पा मारत बसले होते. सुरक्षारक्षकाचा आवाज ऐकून सर्वांनी रस्त्यावर धाव घेतली. रहिवाशांना पाहताच जीपचालकाने यातील दोघांना घेऊन गट नंबरच्या दिशने पळ काढला. तर खाली राहिलेला एक तरुण अंधाराचा फायदा घेत पसार झाला. रहिवाशांनी या भामट्याचा बराच वेळ शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. दरम्यान, कोल्हे यांनी २५ ते ३० वर्षे वयोगटातील ४ ते ५ तरुण तोंडाला रुमाल बांधून कारमध्ये बसलेले होते, असे सांगितले.
कारचा मोरे चौकापर्यंत पाठलागवडगाव कोल्हाटी गट नंबरकडे पसार झालेली जीप अर्ध्या तासानंतर तीसगाव चौफुलीकडून पुन्हा त्या ठिकाणी आली व तिसºया तरुणाला घेऊन बजाजनगर स्मशानभूमी रस्त्याच्या दिशेने निघून गेली. रहिवासी एकनाथ हांडे व काही व्यक्तींनी दुचाकीने मोरे चौकापर्यंत पाठलाग केला; पण पंढरपूरच्या दिशेने गेली. जीपच्या पाठीमागील काचेवर पांढºया रंगात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व शेवटचा ४४८१ (पूर्ण नंबर नाही) हा नंबर दिसून आल्याचे हांडे व ठोंबरे यांनी सांगितले.