पैठण शहरातील जुने कावसन येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सुरू असताना पुन्हा एका हत्येने गुरुवारी पैठण शहर हादरले आहे. गोदावरी काठालगत असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिरात गुरूवारी सायंकाळी पैठण शहरातील कहारवाडा येथील रहिवासी नंदू देविदास घुंगासे या युवकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, सपोनि. सुदाम वारे, फौजदार रामकृष्ण सागडे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला.
महादेवाच्या पिंडीला बिलगून गुडघ्यावर बसलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे रक्त पिंडीवर पडत होते. मंदिरात पोलिसांना धारदार कटरचा एक तुकडा सापडला असून याच कटरने हत्या किंवा आत्महत्या करण्यात आली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान नंदू घुंगासे हा पैठण मच्छी मार्केटमध्ये मासे विक्रीचा व्यवसाय करीत होता. मात्र,वर्षभरापूर्वी मासेविक्री बंद करून मासे पकडण्याचे जाळे विकण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला असे नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी सांगितले. मयत नंदूची आई व नंदू हे महादेवाचे भक्त होते. नंदुची आई नियमितपणे महादेव मंदिरात येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. नंदूही अधूनमधून गंगेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत होता. गुरुवारी मात्र नंदुचा मृतदेह मंदिरातील पिंडीवर आढळून आल्याने नंदुच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
चौकट
पोलिसांनी वर्तविला आत्महत्येचा अंदाज
कहारवाडा पैठण येथील युवक नंदू घुंगासे याने गंगेश्वर महादेव मंदिरात आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी गळ्यावर झालेले वार लक्षात घेता असे मत व्यक्त केले असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.
फोटो : पैठणमधील गोदावरी काठावर असलेल्या याच गंगेश्वर महादेव मंदिरात पिंडीवर नंदू घुंगासे याचा मृतदेह आढळून आला.