औरंगाबाद : वेळ रात्री १० वा ५० मिनिटांची, स्थळ संग्रामनगर रेल्वे गेट.औरंगाबादहून अंजठा एक्सप्रेस येण्याचा आवाज येत होता. अचानक रेल्वे पटरीवर एक तरुण आत्महत्येच्या उद्देशाने झोपला. याच दरम्यान येथून जाणारे विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांच्या नजरेस हे दृश्य पडले असता त्यांनी त्या युवकास सहका-यांच्या मदतीने तात्काळ बाजूला घेतले व त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर त्याला समजावत पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले.
भाऊसाहेब तुकाराम भालेराव ( २२, रा. हायकोर्ट कॉलनी)असे त्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेबचे वडील ट्रक चालक असून तो आपल्या आई व वडिलांसोबत हायकोर्ट कॉलनी येथे राहतो. त्याचे एक घर शिवशंकर कॉलनीमध्येसुद्धा आहे. वयाच्या ११ व्या वर्षी इमारतीवरून पडल्याने त्याचा उजवा पाय मोडलेला आहे. त्याचे आई-वडील त्याला सातत्याने तू काही तरी काम करावे यासाठी तगादा लावत. वडिलांनी त्याला खाजगी शिकवणीवर हाऊस किपिंगचे काम मिळवून दिले. त्यानंतर तो स्कूलबसवर क्लीनर म्हणून काम करत होता. मात्र, ते काम सोडून त्याने काही काळ हॉटेलवर काम केले व तेही सोडले. त्याचे कामात सातत्य नसल्याने आई-वडिल त्याला नेहमी रागवत असत.
कायम मित्रांसोबत मौजमस्ती करावी या विचाराच्या भाऊसाहेबाचे यामुळे वडिलांसोबत खटके उडत. तसेच त्याने आई-वडिलांना भिती वाटावी म्हणून यापूर्वी २-३ वेळेस आत्महत्या करण्याचे नाटक केले आहे. याच दरम्यान काल रात्री त्याचे आई-वडिलांसोबत भांडण झाल्याने त्यात वडिलाने मारहाण केली. याचाच मनात राग ठेऊन त्याने दारू पिऊन वडिलांसोबत परत भांडण केले व स्वतः जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील दोन युवकांनी त्याला रोखले. यामुळे आज कसे ही करून आत्महत्या करायचीच असे म्हणत त्याने थेट संग्रामनगर येथील रेल्वे गेट गाठले व तो तेथे रुळावर झोपला.
हे दृष्य श्रीमंत गोर्डे पाटील या विशेष पोलीस अधिका-याने पाहताच त्यांनी त्याला समजावले व तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तो दाद देत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी विषेश पोलीस अधिकारी अॅड. रामदास भोसले, स्वराज गोर्डे पाटील, वेदांत जोशी, अर्जुन झुंबड, रोणीत वाघ, ज्ञानेश्वर मते व डॉ संदीप शुक्रे यांना बोलावून घेतले. याच वेळी समोरून येणारी रेल्वे दिसताच भाऊसाहेब तेथेच अडून राहिला.समजावण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरल्याने त्यांनी शेवटी त्यास तेथून उचलून बाहेर काढले व सातारा पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक चेतन ओगले, ठाणे अंमलदार केशव काकडे, एस. ए. नलावडे यांनी त्याच्या वडिलांना बोलावून घेतले. पोलिसांनी दोघांचेही समुपदेशन करत रात्री १.३० वाजता भाऊसाहेबला त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले.