छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठाने युवकांना वेगवेगळ्या विषयातील पदवी प्रदान केली. पदवी घेणाऱ्या युवकांना ज्ञान, तंत्रज्ञानाचा आधार घेत नोकरी मागणारे नाही तर देणारे झाले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत सोहळा रुक्मिणी सभागृहात शुक्रवारी आयोजित केला होता. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीक्षांत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ.पी.एम. जाधव, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन कदम, डॉ. सुधीर कदम, भाऊसाहेब राजळे, परीक्षा नियंत्रक डॉ. हरिरंग शिंदे, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, डॉ. प्राप्ती देशमुख, डॉ.जॉन चेल्लादुराई, प्रा. पार्वती दत्ता, डॉ. विजया मुसांडे, डॉ. परमिंदर कौर यांची उपस्थिती होती.
यावेळी गडकरी म्हणाले, महात्मा गांधी यांनी खेड्यांच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या विचारावरच खेड्यांचा विकास झाला पाहिजे. पुन्हा एकद शहरातून लोक गावाकडे गेले पाहिजेत. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा गावात रस्ते, वीज, पाणी, शाळा, आरोग्य, मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध होतील. हे करण्यासाठी शेतकरी निव्वळ अन्नदाता राहून चालणार नाही. त्यास उर्जादाता, पेट्रोलदाता बनावे लागेल, असेही गडकरी यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप कुलपती अंकुशराव कदम यांनी केला. सुरुवातीला विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी मांडला. प्रत्येक विद्याशाखेच्या अधिष्ठातांनी पदवीप्रदान केल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची घोषणा केली. यावेळी दहा विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. संचालन कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.