वाळूज महानगर : लघुशंकेसाठी थांबलेल्या परप्रांतीय ट्रकचालकास दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी मारहाण करून लुटल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास करोडी शिवारात घडली. या घटनेनंतर तरुणांनी पाठलाग करून एकास पकडले तर दोघे पळून गेले. लूटमारीची घटना घडली नसल्याचा दावा दौलताबाद पोलिसांनी केला आहे.
ट्रक क्रमांक (जी.जे.१६, झेड ५०७५) या ट्रकचा चालक अच्छेलाल यादव (वय ४२ रा. गुजरात) हा हैद्राबादकडे जाण्यासाठी शरणापूरहून साजापूरकडे येत होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास चालकाने ट्रक थांबवून तो खाली उतरला. दुचाकीवरुन आलेल्या तिघा अनोळखी भामट्यांनी चालक यादव यांना मारहाण करुन खिशातील रोख ३ हजार रुपये, एटीएमकार्ड, मोबाईल व ट्रकची चावी घेऊन दुचाकीवरून शरणापूरच्या दिशेने निघून गेले. ट्रकचालकाने मदतीसाठी आरडाओरडा केला असता लगतच्या शेतात काम करणाऱ्या तरुण मजुरांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली.
नंतर तिघांचा दोन किलोमीटर पाठलाग करुन शरणापूर शिवारातील नागरिकांनी संशयित दुचाकी अडविली. दुचाकीच्या पाठीमागे बसलेले दोघे भामटे पकडले जाण्याच्या भीतीने घटनास्थळावरुन पसार झाले. यानंतर दुचाकीस्वार भामट्यास पकडून चोप दिल्यानंतर तरुणांनी पकडलेल्या भामट्यास दौलताबाद पोलिसांच्या स्वाधीन केले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालकास लूटमार करणारे भामटे वाळूजचे असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लूटमारीची घटना झाली नसल्याचा दावा केला.