गंगापूर : स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस व्हॅन रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान गंगापूरहून लासूरकडे जात होती. दरम्यान, शिंदेवाडी शिवारात दोन व्यक्ती अजय राजू दहातोंडे (वय २०, रा. वडगाव कोल्हाटी) यास धारदार शस्त्राने मारहाण करीत असल्याचे दिसून आले. पोलीस व्हॅनमधील वाल्मिक मेटे यांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच मारेकऱ्यांना हटकल्याने पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचे प्राण वाचले.
त्यानंतर पोलिसांनी हल्ले करणाऱ्यांचा चार किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. यात करण मारोती गायकवाड (रा. वडगांव) व आकाश देवानंद जाधव (रा. मिटमिटा) यांना ताब्यात घेतले. आरोपीकडील धारदार शस्त्र ताब्यात घेण्यात आले. त्याच दरम्यान जखमी अजयला खासगी वाहनाने गंगापूर रुग्णालयात पाठविण्यात आले. गंगापुरात प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तिघेही मित्र असून पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. जखमी अजयची चौकशी केल्यानंतरच हल्ल्याचे खरे कारण समजणार आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर निकम, मुरकुटे, बहुरे या पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्न केले.