बीड : शहरातील बार्शी रस्त्यावरुन बसचालकाचे अपहरण झाल्याचे अफवेने पोलिसांची धांदल उडाली होती. याप्रकरणी कारचालकाच्या फिर्यादीवरुन नुकसान केल्यावरुन बसचालकावरच गुन्हा नोंद झाला.सातारा- बीड बस (क्र.एमएच १४ बीके- ३७८५) बुधवारी सायंकाळी बीडकडे येत होती. बार्शी रस्त्यावरील गतिरोधकावर बस आदळून स्टेपनी कार (क्र. एमएच ११ व्हीझेड- ९०१९) वर पडली. यात कारचे नुकसान झाले. भरपाईची रक्कम ठरविण्याकरती कारचालक सचिन सोनाजी पवार (रा. पंचशीलनगर, बीड) हे बसचालक महादेव नागरगोजे यांना घेऊन गॅरेजकडे निघाले. मात्र, काही प्रवाशांना बसचालकाचे अपहरण होत असल्याचे वाटले. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. मोंढा चौकात कार पकडून शिवाजीनगर ठाण्यात नेली. नागरगोजे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर अपहरणनाट्यावर पडदा पडला. दरम्यान, कारचालकाक पवार यांच्या फिर्यादीवरुन कारचे नुकसान केल्याप्रकरणी बसचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
अपहरण नाट्याला बीडमध्ये ‘यू टर्न’
By admin | Published: March 30, 2017 11:35 PM