फुलंब्री : तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने काम अर्धवट असताना बिले काढण्यात तत्परता दाखविल्याने काम गुलदस्त्यात असल्याचा आरोप केला जात आहे. या विभागाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील वाघलगाव येथे तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामात घोळ झालेला असल्याचे निदर्शनास आले आहे. काम पूर्ण झालेले नसताना बिले काढण्यात कोणत्या अधिकाऱ्याला घाई होती याची शहानिशा केली तर अनेक कामांचे या विभागाचे बिंग फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फुलंब्री तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता म्हणून आनंद मेटे हे गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत होते. ते ३१ जुले रोजी सेवानिवृत्त झाले. वाघलगाव येथील कामाचे बिल ही त्याच्या कार्यकाळात काढण्यात आले. हे बिल घाईमध्ये काढण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी अनेक कामे केली त्याच्या कार्यकाळात झालेल्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर यांनी केली आहे.
----
तालुक्यातील कामांची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकवेळा मोबाईलवर संपर्क साधला. परंतु त्या अधिकाऱ्याने फोन स्वीकारला नाही. त्यांना व्हाॅट्असॲपवर निरोप ही दिला. पण त्यांनी उतर देण्याची तसदी घेतली नाही.