विठ्ठल फुलारी, भोकरआनापान साधनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनाची व कार्यक्षमतेची उंची वाढविणारा 'मित्र उपक्रम' राबविण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली नांदेड जिल्हा परिषदेत होत आहे़ आजच्या संगणक युगात बालके शिक्षण वा या ना त्या कारणाने आजी-आजोबापासून दूर गेले, तर आई-वडिलांना आपल्याच मुलांना नीतिमत्तेचे धडे देण्यास वेळ अपुरा पडतो़ यामुळे अनेक विद्यार्थी संस्कारापासून दूर जात असल्याची आजची स्थिती आहे़ शालेय जीवनात विद्यार्थ्यांना ताणतणाव भासू नये व तो वाईट गोष्टीकडे जावू नये म्हणून आनापान साधनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनाची व कार्यक्षमतेची उंची वाढविणारा मित्र उपक्रम सुरू करण्याचे परिपत्रक राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी ५ आॅक्टोबर २०११ रोजी काढले़ यानंतर अनेकवेळा शिक्षण विभागाने सूचना दिल्या़, परंतु त्याकडे नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले़आनापान साधना पद्धती म्हणजे विपश्यना शिकण्याची पहिली पायरी आहे़ आनापान साधनेच्या दैनंदिन सरावामुळे विद्यार्थी वाईट गोष्टींपासून, खोटे बोलण्यापासून दूर राहतात़ मनावर नियंत्रण ठेवण्यासही यशस्वी होतात़ यातूनच विद्यार्थ्यांच्या मनाची व कार्यक्षमतेची उंची वाढते़ हे सर्व मित्र उपक्रमातून साध्य होवू शकते़ सदरील उपक्रम राबविण्यासाठी शाळा, गाव, तालुका व जिल्हा येथे समित्या गठीत करणे गरजेचे आहे़ यासोबतच दहा दिवस विपश्यना अभ्यास पूर्ण केलेल्या शिक्षकांची व तीन विपश्यना पूर्ण केलेल्या साधकाची नियुक्ती करून शिक्षकांचे शिबिरे व प्रशिक्षणाचे नियोजन करून या मित्र उपक्रमाला सुरुवात करणे आवयक होते़शासनाने परिपत्रक काढून व वेळोवेळी सूचना देवूनसुद्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षांत हा उपक्रम राबविण्यास नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभाग कमालीचा उदासीन दिसत आहे़ येणाऱ्या शैक्षणिक वर्षात तरी हा उपक्रम राबेल का, असा प्रश्न पालकांना पडतो आहे़ (वार्ताहर)
मित्र उपक्रमाला जिल्हा परिषदेचा खो
By admin | Published: June 14, 2014 1:18 AM