औरंगाबाद : विकास निधी वाटपामध्ये पक्षपाती भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांना तब्बल तासभर भाजप सदस्यांनी कोंडीत पकडले. अखेर बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी विकास निधीपासून वंचित राहिलेल्या सदस्यांना आठवडाभरातच प्रत्येकी १५ लाखांच्या कामांची प्रशासकीय मान्यता देण्याचे आश्वासन देत संतप्त भाजप सदस्यांची मनधरणी केली.
शिवसेनेच्या देवयानी पाटील डोणगावकर या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. जिल्हा परिषदेत भाजपची सदस्य संख्या सर्वाधिक असतानाही सेना व काँग्रेसने आघाडी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. हे शल्य भाजप सदस्यांमध्ये आहे. दुसरीकडे, जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हांतर्गत रस्ते दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी प्राप्त निधीमध्ये भाजपच्या काही सदस्यांना डावलण्यात आले. या मुद्यावर आजपर्यंत सलग तीन सर्वसाधारण सभांमध्ये भाजप सदस्यांकडून अध्यक्षांची कोंडी केली जाते. मागील सभेत भाजप सदस्य एल.जी. गायकवाड यांना एक दिवसासाठी निलंबितही करण्यात आले होते. मधुकर वालतुरे यांनी याच मुद्यावर अध्यक्षांच्या दालनासमोर उपोषणही केले होते. त्यावेळी आठ दिवसांत वंचित सदस्यांना निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नाही. याचा वचपा काढण्यासाठी भाजप सदस्यांनी सर्वसाधारण सभेला सुरुवात होण्यापूर्वीच अध्यक्षांना घेरण्याची व्यूहरचना आखली होती.
दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात होताच सभेची नोटीस मिळाली नाही, या मुद्यावर सभागृहाला धारेवर धरण्यात आले. त्यानंतर लगेच भाजपचे गटनेते शिवाजी पाथ्रीकर यांनी वंचित सदस्यांना न्याय देणार आहात का, प्रत्येक सभेत आम्ही याच मुद्यावर भांडायचे, तुम्ही प्रत्येक वेळा केवळ आश्वासनेच द्यायची, हे थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला. काही मर्जीतल्या सदस्यांना ४ कोटी रुपयांपर्यंत विकास निधी दिला आणि काही सदस्यांना एक छदामही दिलेला नाही. बांधकाम सभापती विलास भुमरे यांच्यावरील रोष व्यक्त करताना शिवाजी पाथ्रीकर हे पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाव आता वैयक्तिक बांधकाम विभाग आणि या विभागाचे सभापतींचे वैयक्तिक बांधकाम सभापती असे केले, तर ते वावगे ठरणार नाही.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पहिलीच सभासभागृहात तास-दीड तास सुरू असलेले रणकंदन पाहून नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर या अवाक् झाल्या. सदस्य आक्रमकपणे विचारत असलेले प्रश्न आणि बारीक-सारीक मुद्यांवर सभागृहाची केली जाणारी कोंडी हा प्र्रकार पवनीत कौर यांच्यासाठी नवीनच होता. पवनीत कौर यांची आजची ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती.
संपूर्ण सभेत त्या एक शब्दही बोलल्या नाहीत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी सदस्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. भाजप सदस्या रेखा नांदूरकर यांनी ‘आम्हाला न्याय द्या’ असे म्हणत अर्धा तास खुर्चीवर उभ्या राहिल्या. जि.प. सदस्य सुरेश सोनवणे, सुरेश गुजराने, ज्योती चोरडिया, पुष्पा काळे, एल.जी. गायकवाड, मधुकर वालतुरे, प्रकाश चांगुलपाये आदी भाजप सदस्यांनी सभागृहाला धारेवर धरले.