छत्रपती संभाजीनगर : गंगापुर तालुक्यातील ढोरगाव येथभल जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेचा आता कायापालट होणार आहे. समग्र शिक्षा वार्षिक कार्य योजनेतंर्गत नवीन ६ खोल्यांच्या बांधकामासाठी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार २०२३-२४ च्या अंर्थसंकल्पात निधी मंजुर करण्यात आला.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालकांना ढोरेगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण होऊन मोडकळीस आली होती. १९६२ साली स्थापन झालेल्या या शाळेचे छत केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आ. चव्हाण यांनी १६ सप्टेंबर २०२२ रोजी प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांच्या पत्राद्वारे शाळेची स्थिती निदर्शनास आणून दिली होती. या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसविणेही धोकादायक बनले होते.
त्यामुळे शाळांच्या दुरुस्तीसाठी नव्हे तर नव्याने खोल्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याशिवाय ११ डिसेंबर २०१८ रोजीही जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही ढोरगावची शाळा दुरुस्तीसाठी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ७ मार्च २०२२ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशानात आ. चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प समन्वयक समीर सावंत यांनी ५ जुलै रोजी परिपत्रक काढून शाळेसाठी नवीन ६ खोल्या बांधण्याविषयीचे पत्र काढले आहे. त्यासाठी ८१ लाख रुपयांचा निधीही मंजूर केल्याचे पत्रात म्हटले आहे. ढोरगावच्या जि.प. शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे गिरवता येणार असल्याचे आ. चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्यात १९ वर्गखोल्यासाठी आडीच कोटीराज्यातील धोकादायक, मोडखळीस आलेल्या १९ वर्गखोल्यांची बुलढाणा, अमरावती, कोल्हापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने उभारणी होणार आहे. त्यासाठी १ कोटी ५६ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला. त्यात ढोरगावच्या शाळेच्या ६ खाेल्यांचा समावेश असून, त्यासाठी ८१ लाख रुपयांचा निधी असणार आहे.