लातूर : जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतरही निलंगेकर आणि देशमुख यांच्यातील कलगीतुरा थांबायचे नाव घेत नाही. जिल्हा परिषदेतील मोठ्या विजयानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराव पाटील निलंगेकरांनी देशमुखांवर थेट हल्लाबोल करताना ‘या जिल्ह्यात आमच्याशिवाय कुणी नाही, असा समज पसरविण्यात आला होता. दुसरे कुणी आले तर त्यांची हेटाळणी व उपहास केला जायचा. आता जिल्हा परिषदेत झालेला आमचा हा विजय म्हणजे लातुरात लोकशाही अवतरल्याचे प्रतीक’ असल्याचे सांगून इंग्रज, निजामानंतर लातुरात आत्ताच लोकशाही रुजल्याचे वक्तव्य पत्रकार परिषदेत शुक्रवारी केले. आता या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते, याची उत्सुकता आहे.पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि आमदार दिलीपराव देशमुख यांच्यात जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलाच कलगीतुरा रंगला होता. आमदार अमित देशमुख यांनीही निलंगेकरांवर प्रहार केले होते. त्यानंतर निलंगेकरांनीही पलटवार केले होते. निवडणुका झाल्या तरी यांच्यातील कलगीतुरा थांबायचे नाव घेईनासा झाला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीरावांनी देशमुखांच्या कार्यपध्दतीवरच शंका उपस्थित केल्या. ते म्हणाले की, आधी आपण इंग्रजांच्या गुलामीतून ४७ ला स्वतंत्र झालो. नंतर एक वर्षानंतर निजामापासून स्वतंत्र झालो. पण लातूरकरांना जिल्हा परिषदेनंतर आत्ता लोकशाही रुजल्याचे सांगणारे आहे. हा भाजपाचा विजय सांघिक यश आहेच, त्याशिवाय सामान्य लोकांचा विजय आहे. राज्य सरकारने केलेल्या कामाची दखल घेऊन लोकांनी आम्हाला निवडून दिले. ३६ ते ४२ असा आमचा अंदाज होता. पण आमच्या चार ते पाच जागा का गमावल्या यावर आम्ही मंथन करीत आहोत.
जिल्हा परिषदेतील भाजपा विजय लातुरात लोकशाही रुजल्याचे प्रतीक
By admin | Published: February 25, 2017 12:31 AM