औरंगाबाद : ‘सुपोषित औरंगाबाद’ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शंभर टक्के बालकांचे वजन व उंची घेऊन वर्गीकरणाद्वारे तीव्र कुपोषित (सॅम) व इतर दुर्धर आजार आढळणाऱ्या बालकांना संदर्भसेवा देणे, तसेच ‘सॅम’ बालकांच्या उपचारासाठी ग्राम बालविकास केंद्र, सीटीसी, ‘एनआरसी’स्तरावर सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जि. प.चा महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील तीव्र कुपोषित (सॅम) व मध्यम कुपोषित (मॅम) बालकांसाठी विशेष धडक शोधमोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेची सुरुवात मंगळवारपासून करण्यात आली. वरुडकाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी जि. प. अध्यक्षा मीना शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, सभापती अनुराधा चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आदींसह परिसरातील पालक उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी ताईंनी आपल्या अंगणवाडी पटावरील ० ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांची पथकाद्वारे स्क्रीनिंग करून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी.
जि. प. अध्यक्षा मीना शेळके यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. ही मोहीम निश्चित ध्येय साधून सुपोषित औरंगाबादकरिता पूरक आहे, असे त्या म्हणाल्या. सभापती अनुराधा चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.
चौकट......................
जिल्ह्यात सध्या ३७३ तीव्र कुपोषित बालके
जिल्ह्यात सध्या ‘सॅम’ बालकांची संख्या ३७३ आहे. आता या मोहिमेत आढळणाऱ्या ‘सॅम’ श्रेणीतील बालकांच्या सनियंत्रणासाठी संयुक्त यंत्रणा सज्ज केली आहे. कुपोषण निर्मूलन आणि सुपोषित औरंगाबादकरिता आगामी काळात या मोहिमेला अधिक गती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण ४११ पथके स्थापन करण्यात आली असून यामध्ये वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी ताई, आशा कार्यकर्ती आणि एएनएम, मदतनीस आदींचा सहभाग आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही मोहीम चालणार आहे.
- प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी