लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कार्यरत जि. प. कर्मचा-यांना आता ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बायोमेट्रिक हजेरी द्यावी लागणार आहे. ग्रामविकास विभागाच्या या आदेशानुसार जिल्हा परिषद पंचायत विभागाने ‘बीडीओं’मार्फत बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत. तथापि, या नवीन निर्णयामुळे मात्र, दांडीबहाद्दर कर्मचा-यांवर अंकुश येणार आहे.यासंदर्भात गेल्या महिन्यात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला काही सूचना केल्या होत्या. जिल्ह्यात प्रामुख्याने ३ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जि. प. शाळांमधील शिक्षक, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामसेवक तसेच अन्य कर्मचारी व अधिकाºयांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन दैनंदिन हजेरी यापुढे बायोमेट्रिक यंत्रावरच द्यावी. ज्यामुळे ग्रामीण भागातदेखील अधिकारी- कर्मचारी कामांवर वेळेत येतील व जातीलसुद्धा. ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याबाबत स्वत: गटविकास अधिकाºयांनी पडताळणी करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आलेआहे.दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाच्या या भूमिकेवर कर्मचाºयांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. माध्यमिक शिक्षक भारतीच्या पदाधिकाºयांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन बायोमेट्रिक हजेरी देण्यास विरोध दर्शविला आहे. बायोमेट्रिक हजेरीला आमचा विरोध नाही. ग्रामपंचायत कार्यालयाऐवजी शाळांमध्ये असे यंत्र लावल्यास शिक्षकांना शाळेत येताना व सायंकाळी घरी परतताना बायोमेट्रिक हजेरी लावणे सोपे जाईल. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयापासून जि.प.च्या प्राथमिक, माध्यमिक, भागशाळा, वस्तिशाळा, आरोग्य केंद्रे, पशुवैद्यकीय दवाखाने, अंगणवाड्या दूर अंतरावर आहेत. काही ठिकाणी हे अंतर अडीच ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत दूर आहे. असे असताना कर्मचारी- अधिकाºयांना हजेरीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात ये-जा करणे परवडणारे नाही. बायोमेट्रिक हजेरीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात एकाच वेळी विविध विभागांच्या कर्मचाºयांची गर्दी होईल. ही संभाव्य स्थिती लक्षात घेता त्या त्या विभागांमध्येच बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात यावे, असा प्रस्ताव माध्यमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, गणेश राठोड, अमरसिंह चंदेल, संतोष ताठे, महेंद्र बारवाल आदी पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याकडे सादर केला आहे.मोठ्या ग्रामपंचायतींसाठी विचारयासंदर्भात जि. प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके म्हणाले की, ग्रामीण विभागातील जि. प. कर्मचाºयांच्या बायोमेट्रिक हजेरीबाबत ग्रामविकास विभागाच्या सूचना आहेत. सुरुवातीला सरसकट सर्वच ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात हा निर्णय लागू करणे शक्य नाही. त्यामुळे अगोदर मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक हजेरी घेतली जाईल. तरीही मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांच्यासोबत चर्चा करून यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाईल.
जि.प. कर्मचा-यांनी ग्रामपंचायतींमध्येच द्यावी बायोमेट्रिक हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:46 PM