औरंगाबाद: भ्रष्टाचारप्रकरणी सरपंचांना पदमुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सरणावर झोपून आंदोलन केले. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. अखेर पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. आंदोलनकर्त्याला सरणावरच कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.पैठण तालुक्यातील टाकळी (अंबड) ग्रामपंचायतीच्या सरपंच उषाबाई नरके व ग्रामविकास अधिकारी पी. डी. मोरे यांचा भ्रष्ट कारभार व त्यांनी केलेल्या अनियमिततांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी उपसरपंच प्रभाबाई निकाळजे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली नरके, प्रयाग राऊत, दिलीप नरके, रामदास खवले, शिवनाथ खडके व रामदास ढोले यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. आंदोलनप्रसंगी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर सरण रचून त्यावर रामदास ढोले हे झोपले. ढोले यांना पांढरा कपडा गुंडाळला. गळ्यात पुष्पहार घालून त्यांना पार्थिवाप्रमाणे सजविण्यात आले. हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अखेर या आंदोलनाची दखल पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांना घ्यावी लागली. त्या आंदोलनस्थळी आल्या. तेव्हा आंदोलनकर्त्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले.उपसरपंच प्रभाबाई निकाळजे, रामदास ढोले यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांच्या निदर्शनास आणून दिले की, टाकळीच्या (अंबड) सरपंच उषा नरके व ग्रामविकास अधिकारी पी.डी. मोरे यांनी केलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास प्रशासनाने जाणीवपूर्वक दिरंगाई केली आहे. ग्रामपंचायतीच्या चौकशीचे काम मागील चार महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी सदरील ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी केली. त्यामध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकाºयांवर अनियमिततेचा ठपका ठेवला असून, महिनाभरापूर्वी जि.प. पंचायत विभागास चौकशी अहवाल सादर केला आहे. तो अहवाल दडपण्यात आला आहे. दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी सदरील प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर सदरील आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पैठण तालुकाध्यक्ष विनोद तांबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
जि.प. समोर सरणावर झोपून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:17 PM
भ्रष्टाचारप्रकरणी सरपंचांना पदमुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सरणावर झोपून आंदोलन केले. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
ठळक मुद्देअनोखे आंदोलन: प्रशासनाला घ्यावी लागली दखल