बीड : शिक्षण व आरोग्य खाते न मिळाल्याने नाराज झालेल्या जि.प. उपाध्यक्षा जयश्री मस्के यांनी कृषी व पशुसंवर्धन समिती न स्वीकारल्याने या समितीचा अतिरिक्त कार्यभार अध्यक्षा सविता गोल्हार यांच्याकडे आला आहे. अध्यक्षपदासह स्थायी समिती व जलसंधारण समितीची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा भार वाढला आहे.अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर सविता गोल्हार यांनी १७ एप्रिल रोजी खातेवाटपासाठी पहिली सर्वसाधारण सभा बोलावली होती. या सभेत शिक्षण व आरोग्य खात्यावरुन उपाध्यक्षा जयश्री मस्के व सभापती राजेसाहेब देशमुख यांच्यात चढाओढ लागली. गोल्हार यांनी सभा तहकूब केली होती. बुधवारच्या सर्वसाधारण सभेत खातेवाटप झाले. शिवसंग्रामने तलवार म्यान केल्याने शिक्षण व आरोग्य खाते राजेसाहेब देशमुख यांच्याकडे आले. उरलेल्या एकमेव कृषी व पशुसंवर्धन समितीची धुरा उपाध्यक्षांकडे जाणे अपेक्षित आहे; परंतु त्यांनी सभेत हे खाते घेण्यास स्पष्ट नकार दिला. अध्यक्षांच्या विनंतीनंतरही त्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. त्यामुळे हे खाते आपोआपच अध्यक्षांकडे गेले आहे. सविता गोल्हार स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्षा आहेत. शिवाय जलसंधारण समितीच्याही त्या अध्यक्षा आहेत. उपाध्यक्षा जयश्री मस्के यांची नाराजी दूर झाल्यास पुन्हा विशेष सर्वसाधारण सभा बोलावून त्यांना या खात्याचे वाटप करावे लागेल. त्यामुळे अध्यक्षा गोल्हार यांच्यावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे. (प्रतिनिधी)
जि.प. अध्यक्षांवर कामाचा बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2017 12:35 AM