औरंगाबाद : पवनीत कौर यांनी आज दुपारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे घेतली. त्यानंतर लगेच त्यांनी गणोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली.
शासनाने काल सोमवारी राज्यातील २८ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी, तर त्यांच्या जागेवर पवनीत कौर यांची बदली झाली. आज दुसऱ्या दिवसी मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पवनीत कौर जिल्हा परिषदेत दाखल झाल्या. त्यांनी आल्याबरोबर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पदभार घेतला. त्यानंतर लगेच सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली.
या बैठकीत अधिकाऱ्यांकडील कामाचे स्वरुप व परिचय जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद मुख्यालयात फिरुन काही विभागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेतली.
तेथून त्या थेट गणोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीसाठी रवाना झाल्या. तेथे दाखल रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन आरोग्य केंद्रांच्या कामाकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर ग्रामपंचायतीला भेट दिली. ग्रामस्थांसोबत संवाद साधत त्यांनी समस्याही जाणून घेतल्या. त्यानंतर गावात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर हे उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांना हुलकावणीमंगळवारी दुपारी पवनीत कौर या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पदाभर घेणार याची माहिती सकाळपासूनच जिल्हा परिषदेत पसरली. त्या दुपारी जिल्हा परिषदेत आल्या. त्यांनी एकाकी पदभार घेतला आणि जिल्हा परिषदेतून काही अवधीनंतर निघूनही गेल्या. मधुकरराजे आर्दड हे शहरातच होते. त्यांनी कौर यांच्याकडे सूत्रे सुपूर्द करण्यासाठी जिल्हा परिषदेत यायला हवे होते; पण ते आले नाहीत, याची चर्चा मात्र, दिवसभर जिल्हा परिषदेत सुरु होती. कौर यांनी पदभार घेतल्यानंतर पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या स्वागतार्थ भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण त्या दुपारनंतर जिल्हा परिषदेत आल्याच नाहीत. त्यामुळे पदाधिकारी- सदस्यांचा चांगलाच हिरमोड झाला.