--
औरंगाबाद : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे गट हे कोरोनामुक्त व्हावेत आणि कोरोनामुक्त राहावेत यासाठी जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमांना सहकार्य करावे. काही सूचना असल्यास ई-मेल किंवा दूरध्वनीवर कळवा, असे पत्र जिल्हा परिषदेच्या सदस्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांनी पाठवले असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी दिली.
जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अखेर जिल्ह्यात ७,५५१ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. ग्रामीण भागात ११ कोविड केअर सेंटर सुरू असून, शहरी भागातून १२ कोविड केअर सेंटर, तर १२ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात नुकतीच केंद्रीय पथकाने भेट दिली असून, कंटेन्मेंट झोन तयार करणे, एका बाधितामागे २० जणांचे काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी, आयएलआय सारी सर्वेक्षण, मास्क वापरण्यासाठी प्रबोधन करणे आणि लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृतीच्या उपाययोजना सुरू असून, त्यात आपण व आपल्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे पत्रात म्हटले आहे.
---
औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
---
औरंगाबाद तालुक्यात ५८१, खुलताबादमध्ये ५४, गंगापूर २१६, सिल्लोड ८५, पैठण ९९, वैजापूर २८८, तर सोयगावमध्ये १० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. खबरदारी म्हणून मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी त्रिसूत्रीचे पालन करा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी केले, तर गावपातळीवरच्या दक्षता समित्या सक्रिय करणे, निर्जंतुकीकरण, तपासणी आणि लसीकरणाला गती देण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्याची माहिती डॉ. भोकरे यांनी दिली.
---