रायपूर: कर्नाटक विधानसभेचा निकाल लागला आणि दिल्लीत मुख्यमंत्री कोण यावरून खलबते सुरु झाली आहेत. सिद्धरामय्या की शिवकुमार यांना करायचे यावरून एकमत होत नाहीय तोच कर्नाटकातील दोन आणि तीन वर्षांच्या फॉर्म्युल्याने तिकडे छत्तीसगडमध्ये राजकारण उकळू लागले आहे. त्याची झळ दिल्लीत बसू लागताच काँग्रेसने दिल्लीतून तातडीने काँग्रेस प्रभारी कुमारी शैलजा यांना पाठवून दिले आहे.
कुमारी शैलजा या मंगळवारी सकाळीच अचानक रायपूरमध्ये आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शैलजा यांनी येताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तळ ठोकून मंत्र्यांच्या एकेक करून बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे छत्तीसगढ काँग्रेसमध्य सारे काही आलबेल नसल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जो फॉर्म्युला ठरविला जात आहे, छत्तीसगडमध्ये देखील तसाच फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. याची चर्चा गेल्या साडे चार वर्षांपासून तिथे होत आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर हायकमांडने तिथे अडीज-अडीज वर्षांचा फॉर्म्युला ठेवला होता. भूपेश बघेल सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री नंतर टीएस सिंहदेव यांना पुढची टर्म दिली जाणार होती. परंतु, बघेल यांनी हे पद सोडलेले नाहीय.
काँग्रेसने हा फॉर्म्युला कधी सार्वजनिक केला नाही, नाही बघेल यांनी तो पाळला. मात्र, सिंहदेव यांचे समर्थक जरूर याची चर्चा करत असतात. अडीच वर्षे झाल्यानंतर सिंहदेव यांनी देखील अनेकदा मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगितला आहे. तसेच हायकमांडवर अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली आहे. आता तर निवडणुका जवळ आल्या आहेत.
कुठे पुन्हा चर्चा सुरु झाली...शिवकुमार यांना जेव्हा पुढची तीन वर्षे सीएमपद देण्याचा प्रस्ताव ठेवला गेला तेव्हा त्यांनी छत्तीसगडमध्ये असाच फॉर्म्युला पाळला गेला नाही, याची आठवण त्यांनी हायकमांडला करून दिली. मग कर्नाटकात तो लागू होईल हे कशावरून, असा सवाल त्यांनी विचारला. यानंतर तातडीने शैलजा यांचा दौरा ठरविण्यात आला आहे. रायपूरमध्ये कोणताही मंत्री, नेता यावर काही बोलत नाहीय. शैलजा यांनी गृहमंत्री ताम्रध्वज साहू आणइ पीएचई मंत्री रूद्र कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. दोघांनीही यावर बोलण्यास पत्रकारांना नकार दिला आहे.