Chhattisgarh Assembly Election Result 2023: देशभरात झालेल्या चार राज्यात झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत आलेले कल पाहता भाजप ५३ जागांवर, काँग्रेस ३५ जागांवर तर बसप १ जागा आणि अन्य १ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. हे कल पाहता छत्तीसगडमध्ये भाजप सत्ता स्थापन करू शकते, असे सांगितले जात आहे. यातच मध्यंतरी गाजलेल्या महादेव बेटिंग अॅपचा फटका काँग्रेसला बसला असून, याचा चांगला फायदा भाजपला झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अनेक सेलिब्रेटिंची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये काही राजकारण्यांचा समावेश असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून करण्यात आला. ऐन निवडणूक काळात हा मुद्दा गाजला होता. भाजपने प्रचारसभांमध्ये हा मुद्दा ऐरणीवर आणाला होता.
पंतप्रधान मोदी यांनी केली होती भूपेंद्र बघेल यांच्यावर टीका
ऐन निवडणुकीच्या प्रचारकाळात हे प्रकरण समोर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री बघेल यांना लक्ष्य केले. ‘महादेव’ बेटिंग अॅप प्रकरणातील आरोपी शुभम सोनीने मुख्यमंत्री बघेल यांच्यावर गंभीर आरोप केले. मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने शुभम सोनीला फरार घोषित केले. शुभम सोनीच्या सांगण्यावरून असीम दास हा कथितरित्या भूपेश बघेल यांना पैसे पोहोचवत होता, असे सांगितले जात आहे. हाच मुद्दा भाजपच्या पथ्यावर पडला. भाजपला चांगली आघाडी मिळताना दिसत आहे. तर, काँग्रेस मोठ्या पिछाडीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, कथित महादेव बेटिंग अॅप प्रकरणामुळेच छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांची नावे पुढे आली होती. या प्रकरणावरून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्राचारादरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तसेच भाजपच्या सर्व प्रचारकांनी आणि कार्यकर्त्यांनी महादेव बेटिंग अॅप प्रकरणावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. यामुळे निवडणुकीत काँग्रेसविरोधात मतदान झाल्याची चर्चा आहे.