Assembly Elections Result : छत्तीसगडमध्ये मोठी उलथापालथ? काँग्रेसला मागे टाकत भाजपची आघाडी, अशी आहे सद्यस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:43 AM2023-12-03T10:43:48+5:302023-12-03T10:51:31+5:30
बहुतांश एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला असतानाच सुरुवातीच्या कलांमध्ये मात्र भाजपने आघाडी घेतल्याने भूपेश बघेल यांची डोकेदुखी वाढली आहे.
रायपूर : विधानसभा निवडणूक पार पडलेल्या पाचपैकी मिझोराम वगळता इतर चार राज्यांमध्ये आज मतमोजणी होत आहे. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. यातील राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेस, मध्य प्रदेशात भाजप आणि तेलंगणात केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीसमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुन्हा सत्ता खेचून आणण्यात यशस्वी होईल, असा अंदाज विविध सस्थांच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला होता. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये मात्र भाजपने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, विधानसभेच्या ९० जागांपैकी ६१ जागांवरील कल हाती आले असून त्यामधील ३१ जागांवर भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली आहे, तर २८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. तसंच एका जागेवर सीपीआयच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच भाजपने आघाडी घेतल्याने भूपेश बघेल यांची डोकेदुखी वाढली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!
मतांची टक्केवारी काय सांगते?
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत मोजण्यात आलेल्या मतांपैकी भाजपने सर्वाधिक ४४. २३ टक्के मते घेतली आहेत, तर काँग्रेसच्या वाट्याला ४२.३७ मते आली आहेत. मतांच्या टक्केवारीतही भाजप पुढे असल्याने काँग्रेसला पिछाडी कमी करणं, आव्हानात्मक ठरणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना दिलासा देत पिकांच्या आधारभूत किंमतींमध्ये केलेली वाढ, गोरक्षणासाठी घेतलेले निर्णय आणि महिलांसाठी लाभदायक ठरणाऱ्या योजनांच्या आधारे राज्यातील जनता आपल्याला पुन्हा सत्तेची खुर्ची देईल, असा भूपेश बघेल सरकारला विश्वास होता. हा विश्वास सार्थ ठरणार की भाजप बाजी मारणार, हे कळण्यासाठी आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.