Chhattisgarh Budget 2025: छत्तीसगडच्या विष्णूदेव साय सरकारनं सोमवारी आपला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री ओपी चौधरी यांनी १ लाख ६५ हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडला. या वर्षीचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक आहे. अर्थमंत्री ओपी चौधरी यांनी १ तास ४५ मिनिटे अर्थसंकल्पीय भाषण केलं. या अर्थसंकल्पात सरकारनं प्रत्येक वर्गासाठी काही ना काही घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारनं पेट्रोलच्या दरात एक रुपयाची कपात केल्यानं जनतेला दिलासा मिळाणार आहे. तर दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही मोठी घोषणा करण्यात आलीये.
सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. रायपूर प्रेस क्लबच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. “या अर्थसंकल्पामुळे सुशासन प्रस्थापित होईल. हे विश्वास वर्ष म्हणून साजरं केलं जाईल. तंत्रज्ञानाचा विकास होईल, औद्योगिक विकास होईल, नवे औद्योगिक धोरणही सुरू होईल,” असं यावेळी मुख्यमंत्री विष्णूदेव साय म्हणाले.
अर्थसंकल्पात कोणाला काय मिळालं?
विमानतळासाठी ४० कोटी
छत्तीसगडमधील विमानतळांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये १४ मोठ्या नव्या महापालिका, नगरपालिका आहेत. त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री नगरोत्थान योजना असं या योजनेचं नाव आहे. त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं चौधरी यांनी सांगितलं.
मिनी मेट्रोसाठी सर्वेक्षण
मोठ्या शहरांसाठी मिनी मेट्रो विकसित केली जात आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रायपूर ते दुर्ग या मेट्रो रेल्वे सुविधेसाठी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
रायपूरमध्ये नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
रायपूरमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीची स्थापना केली जाईल. त्यासाठी अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जशपूरमधील फुटबॉल स्टेडियम आणि बॅडमिंटन हॉलसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. १२ अतिरिक्त नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. दरम्यान, आता नर्सिंग कॉलेजची संख्या ८ वरून २० होणार असल्याचं ओपी चौधरी म्हणाले.
दिव्यांगांसाठी मोठी घोषणा
दिव्यांगांसाठीच्या विशेष शाळांसाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ८ लाख महिलांना कोट्यधीश बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय आहे. आरोग्य सुरक्षा योजनेसाठी या अर्थसंकल्पात १५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मोबाइल टॉवर योजना
जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मोबाइल टॉवर योजना सुरू करण्यात येणार आहे. गावांना मोबाइल कनेक्टिव्हिटीनं जोडण्याचं काम केलं जाणार आहे. बीजीएफच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहन दिलं जाईल. स्वानच्या संचालनासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
लागू होणार होम स्टे पॉलिसी
छत्तीसगडच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी विशेषत: बस्तर आणि सरगुजासारख्या आदिवासी भागात पर्यटन आणि साहसी उपक्रमांना चालना देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी सरकारनं होमस्टे धोरण लागू केलं आहे. आता पर्यटकांना गावोगावी राहून स्थानिक परंपरा जवळून पाहता येणार असून तेथील पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. या उपक्रमामुळे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक समुदायांना आर्थिक संधीही उपलब्ध होतील.
जशपूरमध्ये अॅडव्हेन्चर टुरिझम
साहसी पर्यटन जशपूर तसंच या परिसरात साहसी पर्यटन आणि विशेष पर्यटन सर्किट विकसित करण्याची योजना आहे. छत्तीसगडला इको टुरिझम आणि अॅडव्हेंचर टुरिझमचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी काम केलं जाणार आहे.