देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येमुख्यमंत्री पदासंदर्भात सस्पेंस होता. या तीनही राज्यांत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. यातच, आता रविवारी छत्तीसगडला नवा मुख्यमंत्री मिळाला असून, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आदिवासी नेते विष्णुदेव साई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. चार वेळा खासदार, दोन वेळा आमदार आणि दोन वेळा प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या विष्णू देव साईंची संपत्ती कोटींच्या घरात आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची माहिती -विष्णुदेव साय यांनी विधानसभा निवडणूक 2023 दरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 3 कोटी रुपयांहूनही अधिकची संपत्ती आहे. Myneta.com नुसार, शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार, विष्णुदेव साय आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे, 3,80,81,550 रुपये एवढी एकूण संपत्ती आहे. तर कर्जासंदर्भात बोलायचे झाल्यास, ते 65,81,921 रुपये एवढे आहे.
कॅशपासून ते बँक डिपॉझिटपर्यंत -छत्तीसगडच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 3.5 लाख रुपये रोख, तर त्यांच्या पत्नीकडे 2.25 लाख रुपये रोख स्वरुपात आहेत. संपूर्ण कुटुंबाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, त्यांच्याकडे एकूण 8.5 लाख रुपये रोख स्वरुपात आहेत. तसेच, त्यांच्या बँक ठेवींसंदर्भात बोलायचे झाल्यास, विष्णुदेव साईं यांचे बँक ऑफ बडोदामध्ये एक लाख रुपये, सीजी राज्य ग्रामीण बँकेत 82 हजार रुपये, एसबीआयच्या खात्यात 15,99,418 रुपये, तर इंडियन बँकेत केवळ 2 हजार रुपये आहेत. तसेच त्यांच्या पत्नीचे राज्य ग्रामीण बँकेच्या खात्यात 10.9 लाख रुपये आहेत.
30 लाख रुपयांचे दागिने, एलआयसीमध्ये गुंतवणूक -छत्तीसगडच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी एलआयसीच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली आहे. दागिन्यांसंदर्भात बोलायचे तर तिच्याकडे 450 ग्रॅम सोने, 2 किलो चांदी आणि एक हिऱ्याची अंगठी आहे. या सर्वांची किंमत सुमारे 30 लाख रुपये एवढी आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीकडे 200 ग्रॅम सोने आणि 3 किलो चांदी आहे. नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर एकही कार नाही. मात्र, त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर आहेत, ज्यांची किंमत सुमारे 11 लाख रुपये आहे.
नव्या मुख्यमंत्र्यांची जमीन आणि घर -विष्णूदेव साय यांच्या स्थावर मालमत्तेसंदर्भात बोलायचे झाल्यास, त्यांच्याकडे 58,43,700 रुपये किमतीची शेतीयोग्य जमीन आहे, 27,21,000 रुपये किमतीची अकृषिक जमीन आहे, तर जशपूरमध्ये एक व्यावसायिक इमारतही आहे, जिची किंमत 20,00,000 रुपये एवढी आहे. याशिवाय त्यांच्याकडे 1,50,00,000 रुपये किमतीची दोन घरेही आहेत. या मालमत्तेशिवाय विष्णुदेव साय यांच्यावर दोन कर्जही आहेत. यांपैकी एक एसबीआयचे सुमारे 7 लाख रुपयांचे कृषी कर्ज आहे. तर दुसरे एसबीआयचेच सुमारे 49 लाख रुपयांचे गृहकर्जही आहेत.