इकडे महाराष्ट्रात खातेवाटप सुरु होते, तिकडे छत्तीसगढमध्ये मंत्रिमंडळात खांदेपालट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 09:52 PM2023-07-14T21:52:55+5:302023-07-14T21:54:53+5:30
छत्तीसगढ़च्या अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्य़ात आले आहेत. दिल्लीतून राहुल गांधी यांच्या फोननंतर सारी सुत्रे हलली आहेत.
लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात तसतशा राज्या राज्यांत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्याच्या कालावधीत सर्वात मोठी उलथापालथ महाराष्ट्रात झाली आहे. केंद्रात मोठी मोदीविरोधी भिंत उभी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या शरद पवारांच्या पक्षातच बंड झाले आहे. अजित पवारांनी मोठा गटच आपल्या बाजुने करत भाजपासोबत सत्तेत गेले आहेत. असे असताना महाराष्ट्रात इकडे खातेवाटप सुरु असताना तिकडे छत्तीसगढमध्ये मोठी राजकीय हालचाल झाली आहे.
छत्तीसगढ़च्या अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्य़ात आले आहेत. मोहन मरकम यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्ग तसेच अल्पसंख्याक आघाडी मंत्री करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्याकडे ऊर्जा खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यापूर्वी हे खाते मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे होते. त्याचबरोबर ताम्रध्वज साहू यांना कृषी खात्याचे मंत्री करण्यात आले आहे. यापूर्वी रवींद्र चौबे यांच्याकडे कृषी मंत्रालय होते. त्याचबरोबर रवींद्र चौबे यांना शालेय शिक्षण आणि सहकार खात्याचे मंत्री करण्यात आले आहे.
मोहन मरकम यांनी शुक्रवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल विश्वभूषण हरिचंद्रन यांनी त्यांना शपथ दिली. प्रेमसाई टेकाम यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेत मरकाम यांना मंत्री करण्यात आले आहे. राज्यात यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काँग्रेसने या हालचाली केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी दिल्लीतून सारी सुत्रे हलली आहेत.
खुद्द राहुल गांधींनी मोहन मरकम यांना फोन केल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांनी मरकाम यांना फोन करून आणखी एक मोठी जबाबदारी दिली जाईल, असे सांगितले. त्यामुळे मोहन मरकम यांनी अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. माझा कार्यकाळ संपल्याचे ते म्हणाले होते.