नवी दिल्ली : छत्तीसगड दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोमवारी तब्बल १२१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये छत्तीसगडचे आयएएस (IAS) अधिकारी अनिल टुटेजा, रायपूरच्या महापौरांचे भाऊ अन्वर ढेबर आणि इतरांच्या मालमत्तांचा समावेश आहे. तसेच छत्तीसगडमध्ये विकल्या जाणार्या दारूच्या प्रत्येक बाटलीवर बेकायदेशीरपणे पैसे गोळा केल्याचा आरोप ईडीने केला आहे. याशिवाय रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचा मोठा भाऊ अन्वर ढेबर याच्या नेतृत्वाखाली गोळा केलेल्या दारूच्या मदतीने २००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचाही आरोप ईडीने केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे मनी लाँड्रिंगचे पुरावे गोळा केले असल्याचे ईडीने म्हटले आहे.
छत्तीसगडमधील दारू घोटाळ्यात व्यापारी अन्वर ढेबरला ६ मे रोजी अटक केल्यानंतर, ईडीने कोर्टात दावा केला की, छत्तीसगडमधील ८०० सरकारी दुकानांमध्ये ३० ते ४० टक्के अवैध देशी दारू विकली जाते, ज्याची विक्री व्यावसायिकाद्वारे केली जात आहे. अन्वर ढेबर आणि आयएएस अधिकारी अनिल टुटेजा यांसारख्या लोकांनी हे सर्वकाही चालवले होते. या सिंडिकेटने ३ वर्षात राज्याची २००० कोटी रुपयांची फसवणूक केली.