PM Modi Chhattisgarh Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्य प्रदेशपाठोपाठ छत्तीसगडमध्ये जाहीर सभा घेतली. येथील रायगड जिल्ह्यात त्यांनी 6350 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस फक्त घोटाळ्यांचे राजकारण करते, त्यामुळे ते फक्त नेत्यांची तिजोरी भरतात, अशी टीका त्यांनी केली.
संबंधित बातमी- 'घमंडीया' आघाडी सनातन धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न करतीये; PM मोदी विरोधकांवर बरसले
यावेळी बोलताना मोदींनी गरिबांना सशक्त बनवण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनाचा खरपूस समाचार घेतला 'काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केली असती तर मला आज इतके कष्ट करावे लागले नसते. देशातील गरिबांना सशक्त बनवू, अशी हमी आम्ही दिली आणि त्याचे परिणाम आज तुम्ही पाहत आहात. केवळ 5 वर्षात 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. भाजप सरकारने नेहमी गरिबांच्या हिताच्या योजना आणल्या, म्हणूनच हे शक्य झाले,' असं मोदी म्हणाले.
छत्तीसगड काँग्रेससाठी ए.टी.एम'एक काळ असा होता जेव्हा छत्तीसगड फक्त नक्षलवादी हल्ले आणि हिंसाचारासाठी ओळखला जात असे. भाजप सरकारच्या प्रयत्नानंतर आज छत्तीसगड, विकासकामांमुळे ओळखला जातो. छत्तीसगडची खनिज संपत्ती काँग्रेस एटीएमप्रमाणे वापरत आहे. खोटा प्रचार आणि भ्रष्टाचार ही छत्तीसगड काँग्रेसची ओळख आहे. अनेक वर्षांनी संधी आली आहे, पुन्हा मिळणार नाही, जमेल तशी लुट करा, अशी काँग्रेसची वृत्ती आहे. काँग्रेस आणि भाजपचा ट्रॅक रेकॉर्ड तुमच्यासमोर आहे' असंही मोदी यावेळी म्हणाले.
संबधित बातमी- 'घमंडिया'च्या प्रत्युत्तरात 'गंदा"; गौतम अदानींचे नाव घेत काँग्रेस नेत्याचा पीएम मोदींवर पलटवार
सनातन धर्माच्या अपमानावर...यावेळी पीएम मोदींनी पुन्हा एकदा सनातन धर्माचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 'छत्तीसगडची भूमी भगवान श्री राम यांची मातृभूमी आहे. येथे माता कौशल्याचे भव्य मंदिर आहे. आपल्या श्रद्धा आणि देशाविरुद्ध होत असलेल्या षडयंत्राची मला तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे. विरोधकांच्या आघाडीने भारतातील सनातन संस्कृती संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेच्या लालसेपोटी या लोकांना हजारो वर्षांपासून भारताला एकसंध ठेवणारी संस्कृती नष्ट करायची आहे, अशी टीका मोदींनी यावेळी केली.