रायपूर : केवळ सावळा रंग आवडत नाही म्हणून पत्नीपासून पतीला वेगळे होण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकत नाही, असे छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका व्यक्तीची घटस्फोटाची याचिका फेटाळताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.
छत्तीसगडमधील बलोदा बाजार जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली होती. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती गौतम भादुडी आणि न्यायमूर्ती दीपक कुमार तिवारी यांच्या खंडपीठाने यावेळी सांगितले की, सावळ्या त्वचेपेक्षा गोऱ्या त्वचेला पसंती देण्याच्या समाजाच्या मानसिकतेत वाढ करण्यासाठी पतीला प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही. समाजात रंगाच्या आधारावर महिलांवरील भेदभाव संपवण्याची गरज आहे.
सौंदर्यप्रसाधनेही करताहेत महिलांना टार्गेटसावळ्या त्वचेच्या महिलांना गोरी त्वचा असलेल्या महिलांपेक्षा कमी लेखले जाते, यावर कोर्टाने चिंता व्यक्त केली. त्वचेला गोरे करणारी सौंदर्यप्रसाधने महिलांना लक्ष्य करतात. ते सावळ्या त्वचेच्या स्त्रियांना कमी आत्मविश्वास आणि असुरक्षित म्हणून चित्रित करतात. जोपर्यंत कोणीतरी त्यांना फेअरनेस क्रीम्स वापरण्यास सुचवत नाही तोपर्यंत ते आयुष्यात यश मिळवू शकत नाहीत, असे जाहिरातींमध्ये सांगितले जाते, हे अतिशय चुकीचे असल्याचे कोर्टाने म्हटले.
पती पत्नीचे म्हणणे काय?पत्नी विनाकारण घरातून निघून गेली आणि अनेक प्रयत्न करूनही परत आली नाही, असा पतीचा युक्तिवाद होता. पत्नीने न्यायालयात सांगितले की, पती तिच्या रंगामुळे तिची चेष्टा करायचा आणि तिच्याबद्दल अपशब्द वापरायचा. त्याच्या अत्याचाराला कंटाळून ती वेगळी राहू लागली.