काॅंग्रेसची दुसरी यादी जाहीर, ५३ जणांना दिली उमेदवारी; अरुण व्होरा यांना दुर्ग शहरातून तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 05:46 AM2023-10-19T05:46:52+5:302023-10-19T05:47:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेसने बुधवारी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत दिवंगत काँग्रेस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसने बुधवारी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत दिवंगत काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांचे पुत्र अरुण व्होरा यांच्या नावाचाही समावेश आहे.
पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार अरुण व्होरा यांना दुर्ग शहरातून उमेदवारी देण्यात आली आहे. व्होरा हे सध्या या जागेवरून आमदारही आहेत. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष रामपुकार सिंग यांना पत्थलगाव विधानसभा मतदारसंघातून, विकास उपाध्याय यांना रायपूर शहर पश्चिम आणि शैलेश पांडे यांना बिलासपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे.
याआधी, गेल्या रविवारी काँग्रेसने ३० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव आणि इतर काही वरिष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश होता. छत्तीसगडमध्ये ९० जागांसाठी ७ आणि १७ नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.