- आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये काँग्रेस एकीकडे विधानसभा निवडणुकीमधील पराभवाची कारणे शोधत असताना पक्षांतर्गत असंतोष बाहेर येत आहे. राज्यातील १२ माजी आमदारांनी दिल्लीत जाऊन संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. यात प्रभारी कुमारी शैलजा, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि माजी उपमुख्यमंत्री टी.एस. सिंह देव यांचा समावेश आहे.
यावेळी माजी आमदारांनी सांगितले की, सर्व्हेच्या आधारावर आमची तिकिटे कापली होती; परंतु, संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून तर छत्तीसगडमध्ये कोणताही सर्व्हे करण्यात आला नव्हता. तथापि, राज्यात तिकीट वाटपात भूपेश बघेल यांनी आपल्या २२ आमदारांचे तिकीट कापले होते. हे आमदार निवडणुकीत पराभूत होणार असल्याच्या सर्व्हेच्या अहवालाच्या आधारावर ही तिकिटे कापण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
आता संपूर्ण पक्षच छत्तीसगड निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर या माजी आमदारांनी दिल्लीच्या नेतृत्वासमोर आपले म्हणणे मांडले. संघटन सरचिटणीसांची भेट घेतल्यानंतर आता या माजी आमदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीसाठी वेळ मागितला आहे.