राजनांदगाव (छत्तीसगड) : पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास काँग्रेस ‘व्होट बँके’साठी तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच ठेवील, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी येथे दिला.
येथील एका जाहीर सभेत शाह म्हणाले की, काँग्रेस सरकारने दिल्लीपर्यंत अन्नसाखळीसारखी (रेस्टॉरंटच्या) ‘भ्रष्टाचार साखळी’ तयार केली आहे. जर भाजप छत्तीसगडमध्ये सत्तेवर आले तर आम्ही भ्रष्टाचाऱ्यांकडून एक-एक पैसा वसूल करू आणि त्यांना उलटे टांगू. काँग्रेसच्या काळात अविभाजित मध्य प्रदेश-छत्तीसगड हे ‘बिमारू’ (मागासलेले) राज्य होते; पण रमणसिंग सत्तेवर आल्यानंतर १५ वर्षांत (२००३ मध्ये) ते विकसित राज्य बनले, असा दावाही त्यांनी केला. एप्रिलमध्ये बेमेटारा जिल्ह्यातील बिरनपूर गावात झालेल्या जातीय हिंसाचारावर भूपेश बघेल सरकारवर शाह यांनी हल्ला केला आणि लोकांना छत्तीसगड पुन्हा जातीय दंगलींचे केंद्र बनवायचे आहे का, असे विचारले. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या राजवटीत विविध घोटाळे झाले, बघेल यांनी राज्याला दिल्ली दरबारचे “एटीएम” बनविल्याचा आरोप शाह यांनी केला.
राजस्थान-छत्तीसगड भ्रष्टाचाराचे एटीएमबंगळुरू येथील छाप्यात काँग्रेसच्या जवळच्या लोकांच्या घरातून १०० कोटींहून अधिक रोख जप्त केल्याचा दावा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. काँग्रेसच्या भ्रष्ट डीएनएचा हा एक छोटासा नमुना आहे. काँग्रेसने छत्तीसगड आणि राजस्थानलाही भ्रष्टाचाराचे एटीएम बनविल्याचे ते म्हणाले.