कुलगुरू निवड समितीसाठी चावला यांची नेमणूक
By admin | Published: August 20, 2015 10:09 PM
आरोग्य विद्यापीठ : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी विद्यापीठाने चंदीगढ येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टट्यिूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च या राष्ट्रीय संस्थेचे संचालक प्रा. वाय.के. चावला यांच्या नावाची शिफारस केली आहे. चावला यांच्या शिफारशीमुळे कुलगुरू निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
आरोग्य विद्यापीठ : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी विद्यापीठाने चंदीगढ येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टट्यिूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च या राष्ट्रीय संस्थेचे संचालक प्रा. वाय.के. चावला यांच्या नावाची शिफारस केली आहे. चावला यांच्या शिफारशीमुळे कुलगुरू निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांचा कार्यकाळ येत्या डिसेंबर मध्ये पूर्ण होत असल्याने विद्यापीठाने याबाबतची माहिती राज्यपाल कार्यालयाला कळविली होती. तसेच आता विद्यापीठ नियुक्त सदस्याचे नावदेखील राज्यपाल कार्यालयाला कळविण्यात आल्याने कुलगुरू निवड प्रक्रियेला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमानुसार राज्यातील कोणत्याही विद्यापीठातील कुलगुरूच्या नियुक्तीसाठी निवड समितीची स्थापना केली जाते. यामध्ये तीन सदस्य नियुक्त केले जातात. एका संबंधित खात्याचे सचिव आणि राज्यपाल नियुक्त सदस्य असतात. समितीमधील एका सदस्याची निवड ही विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत परिषदेत केली जाते. विद्यापीठाने एका सदस्याचे नाव कळविल्याने आता राज्यपाल कार्यालयाकडून निवड समितीच्या अन्य दोन सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल. ही नावे निश्चित झाल्यानंतर कुलगुरू निवडीसाठी वृत्तपत्रात जाहिरात देऊन प्रत्यक्ष कुलगुरू निवड प्रक्रियेला सुरुवात होईल.