-नेत्रा रूपवते
वर्षभरात किती गोष्टी बदलतात. मागच्या वर्षी याच काळात पुन्हा एकदा ‘टोट’बॅग्ज हीट झाल्या होत्या. मोठ्ठाल्या बॅग्ज.जणू पोतीच. एकसे एक रंग.
आणि काखोटीला मारून फिरणार्या मुली. यावर्षी कॅम्पस सुरू झाले आणि हॅण्डबॅग्ज एकाएकी कमी दिसू लागल्या. त्यांची जाग घेतली आहे ‘सॅक’ने. आणि हो, प्लीज सॅक म्हणजे दप्तर नाही. सॅक म्हणजे सॅक. आणि जर तुम्ही स्वत:ची गाडी चालवत कॉलेजात जात असाल (किंवा मित्राच्या/मैत्रिणीच्या मागे डबलसिट जात असाल) तर तुम्ही ‘सॅक’ वापरणार्यांच्या ‘हॅण्डस फ्री’ जगात आपोआप दाखल होतात.
जे सॅक वापरतात ते स्वतर्ही तसे ‘केअर फ्री’च असतात. जे काही व्हायचे ते होवो, असो वाट्टेल ती फॅशन दुनिया आपल्या सॅकमधे गुंडाळून ठेवतात आणि मारतात गाडीला किक. कॉलेजच्या दुनियेत एकाएकी यंदा या सॅकला बरे दिवस आले आहेत. म्हणजे स्वतर्ला फॅशनेबल समजणारे अनेकजणही मस्तपैकी पाठीवर सॅक घेवून फिरताहेत.
विशेष म्हणजे जिन्स+स्लिव्हलेस कुर्ती असा वेष केलेली हायहिल्सवालीही सॅक वापरतेय आणि पाठीवर वेणी, पंजाबी ड्रेस अशी टिपीकलही सॅक घेऊन फिरतेय. गम्मत म्हणजे ज्या मुली जास्त टॉमबाईश लूकच्या असतात त्या मुलांसारख्या मोठय़ा बॅग वापरतात. तर गर्लीश लूकवाल्या मुद्दाम नाजूक-साजूक, अगदी छोटी, लेदर किंवा जिन्सची किंवा कापडाची अगदी खणाची सुद्धा सॅक पाठीवर घेतात. सॅक इतकी लहान की त्यात एक वही सुद्धा मावेल न मावेल. पण ‘हात मोकळे ठेवायचे’ आणि पाठीवर कमीत कमी भार घ्यायचा तर छोटीच सॅक बरी.!
अशा सॅका पाठीवर मारून कॅम्पसभरच नाही तर पावसातही भटकंती करण्याचा सध्या सिझन आहे.!
तुम्ही घेतलीये का, नवीन सॅक.?