रुईयामधील आठवणीबद्दल काय सांगशील?बदलापूरहून पहाटे ४.३०ची लोकल पकडून रुईया कॉलेज गाठत होते. ७ वाजताचे प्रॅक्टिकल करायचे. त्यानंतर १० वाजेपर्यंत जेवढी लेक्चर असतील त्यांना बसायचे. त्यानंतर एकांकिका, डान्स यांच्या तालमी करून रात्री १०.३०ची लोकल पकडून दीड वाजता घरी पोहोचायची. कॉलेजमध्ये दरदिवशी नवनवीन शिकायला मिळाले. लहान-लहान गोष्टींवर मोठमोठ्या चर्चा करायचो. रुईयामधील वेगवेगळे ‘डे’, स्पर्धा, प्रॅक्टिकल परीक्षा हे सर्व करताना खूप आनंद यायचा. प्र्रत्येकाची चेष्टा, मस्ती, चहा-कट्टा, भांडणे, प्रेम-मैत्री यात पाच वर्षे कशी गेली कळलेच नाही.रुईया आणि अभियन यांचा संबंध कसा आला?विंगेत उभे कसे राहायचे यापासून सुरुवात झाली. रुईयातील संतोष वेरुळकर, प्रताप फड, अभिजित खाडे, राजेश शिंदे, सचिन पाठक, नितीन जाधव, मंगेश दादा या सर्वांमुळे अभिनयाची रुची जडली. या सर्वांमुळे नाटक करायला तर शिकलेच, पण बघायलाही शिकले. एकांकिका, दीर्घांक, नाटक, शॉर्ट फिल्म्स, फिल्म्स या सगळ्यामध्ये सहभाग नोंदवला. पंकज चेंबूरकर आणि मृणाल चेंबूरकर यांच्या ग्रुपमधूनही नाटक करायचे. हे सगळे छंद म्हणून करत होते. पण त्यांचा करिअर म्हणून विचारसुद्धा याच लोकांनी करायला लावला. लेक्चर संपवून तालीम करायला सुरुवात करायचो. तालीम करीत असताना वेळ कसा आणि किती जायचा ते कळायचेच नाही. मग कधी कधी खूप उशीर व्हायचा. तेव्हा मित्रमैत्रणींच्या घरी मुक्काम करायची.लांबचा प्रवास, तालीम आणि अभ्यास कसा सांभाळला?मनामध्ये खूप जिद्द असल्यामुळे सर्वकाही करूनदेखील कधी थकवा जाणवला नाही. लोकलमध्ये प्रवास करीत असताना अभ्यास करायचे. परीक्षेच्या वेळी विंगेत अभ्यास करायची. नाटक सोबत असल्यामुळे शारीरिक आणि मानसिक बळ कायम सोबत होते. त्यामुळे अभ्यास करताना कोणतीही अडचण आली नाही.कॉलेज कट्ट्यावर काय धमाल केली?रुईया कट्टा हा एक नॉस्टॅलजिक करणारी गोष्ट आहे. टाइमपास, हसणे-रडणे या सर्व गोष्टी कट्ट्यावर आम्ही केल्या. इथे नाटकासाठी नवे विषयही सुचले. वाट बघायला लावायलाही या कट्ट्याने शिकवले. रुईयामध्ये कमालीच्या मित्रमैत्रिणी भेटल्या. स्पृहा जोशी, सुखदा बर्वे, ऋतुजा बागवे, आशय तुलालवार यांची घरे आणि कुटुंबे तर जशी काही माझीच झाली आहेत. अभ्यासामधील शॉर्टकट मला मानसी महाजन, सागर देशपांडे, अमृता जोशी, दीप्ती अभ्यंकर यांनी शिकवले. त्यामुळे अनेक परीक्षा पास झाले. या सगळ्यांनी प्रेम केले, कौतुक केले, चेष्टा, मस्करी, भांडणे केली आणि खऱ्या अर्थाने दुनियादारी शिकवली.आतापर्यंत कोणकोणती पारितोषिके मिळाली?राजू तुलालवार यांच्या दिग्दर्शनातून अनेक बालनाट्ये केली. ‘ग म भ न’ ही माझी पहिली एकांकिका आणि त्यानंतर ‘कमला’ ही माझी पहिली मालिका. ‘ग म भ न’साठी आय.एन.टी., मृगजळ, सवाई या स्पर्धांमधून पारितोषिके मिळाली. ‘कमला’ मालिकेतील अभिनयासाठी दिग्गजांनी कौतुक केले. यासाठी मला संस्कृती कलादर्पणचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारदेखील मिळालाआहे.>कॉलेजविषयीकाय सांगशील?आदर्श विद्यामंदिर या माझ्या शाळेतून मला खूप काही शिकता आले. स्वत:मध्ये आत्मविश्वास बाळगण्याची प्रेरणा शाळेतूनच मिळाली. कॉलेजमध्ये असताना हाच आत्मविश्वास द्विगुणित झाला. सतर्कपणा आणि नम्रपणामुळे अभिनयाच्या पायºया चढण्यात यशस्वी होत आहे. रामनारायण रुईया महाविद्यालयात शिक्षण झाले. रुईयाबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. आज मी ज्या पदावर आहे, त्यामध्ये माझ्या कॉलेजचा खूप मोठा वाटा आहे. कलाकार म्हणून जितके घडले तेवढेच चांगली व्यक्ती होण्यासाठी कॉलेजमधील संस्कारांनी मदत केली. प्रत्येक वेळी कठीण परिस्थितीत उभे राहायला शिकवले. कॉलेजमध्ये राहून कॉलेजच्या बाहेरील जगातील ज्ञान आत्मसात करायला आणि जगण्याची कला महाविद्यायाने शिकविली.
कॉलेजच्या संस्कारांमुळे घडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:41 AM