स्टील स्क्रॅपपासून पर्यावरणपूरक काँक्रीटची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2016 12:38 AM
जळगाव- लोह व स्टील निर्मिती कारखान्यातून लेथ मशिनमधून बाहेर पडणारे पदार्थ (स्टील स्क्रॅप) काँक्रीट निर्मितीसाठी उपयोगात येऊ शकतात, असे एस.एस.बी.टी.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे.
जळगाव- लोह व स्टील निर्मिती कारखान्यातून लेथ मशिनमधून बाहेर पडणारे पदार्थ (स्टील स्क्रॅप) काँक्रीट निर्मितीसाठी उपयोगात येऊ शकतात, असे एस.एस.बी.टी.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे.बांधकामात वापरण्यात येणार्या क्राँक्रीटमध्ये सिमेंटच्या वजनाच्या १ ते १.५ टक्के प्रमाणात मिसळून स्टील स्क्रॅपचा वापर केला जाऊ शकतो, असे संशोधन विद्यार्थ्यांनी केले आहे. एस.एस.बी.टी.अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागाचे डॉ.शिवराज पाटील आणि प्रा.प्रवीण शिरुळे आणि विभाग प्रमुख डॉ.एम.हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश सोनवणे, कपिल शर्मा, ज्ञानेश्वरी महाजन, वर्षा बर्हाटे या विद्यार्थ्यांनी स्टील स्क्रॅपचा वापर करून पर्यावरणपूरक काँक्रीट तयार केले आहे. तसेच महाविद्यालयाचे शिपाई आर.एम.नेहेते यांची सुद्धा मदत भेटली. दरवर्षी लोह आणि स्टील निर्मिती कारखान्यातून २ ते ४ टन स्क्रॅप तयार होते. काँक्रीट बनविताना स्टील स्क्रॅपचा उपयोग करण्यासाठी विविध प्रकारच्या प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या. यानंतर नैसर्गिक वाळू, खडी, सिमेंट, पाणी आणि स्टील स्क्रॅप यांचे योग्य प्रमाण घेऊन चाचण्या घेण्यात आल्या. लेथ यंत्रामधील निघणार्या स्टील स्क्रॅपची लांबी ही २०-३० मिलिमीटर आणि व्यास ०.३/.५ मिलिमीटर आहे.खूप कमी खर्चात उत्तम दर्जाचा आणि दीर्घ टिकेल असा रस्ता बांधला जाऊ शकतो. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजण्यामध्ये सुद्धा या काँक्रीटचा वापर केला जाऊ शकतो. पावसाळ्यात सुद्धा काही फरक पडणार नाही, जेणेकरुन वाहतुकीला काही अडचण येणार नाही. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक, प्राचार्य आणि प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रकल्प पूर्ण करण्यात मदत झाली.